जालना रेल्वे स्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:23 AM2019-07-05T00:23:46+5:302019-07-05T00:24:25+5:30
रेल्वे स्थानकात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नांदेड रेल्वे विभागाने घेतला आहे.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील रेल्वे स्थानकात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नांदेड रेल्वे विभागाने घेतला आहे. येत्या काही महिन्यात कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे. स्थानकाच्या सुरक्षतेत आता तिस-या डोळ्याची नजर राहणार आहे.
येथील रेल्वे स्थानकातून जलदगती आणि पॅसेजर मिळून दररोज ६४ रेल्वे गाड्यांची ये -जा होत असल्याची माहिती आहे. हजारो प्रवाशांनी रेल्वे स्थानक नेहमीच गजबजलेले असते. मात्र, सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे स्थानकात नसल्याने प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता. औद्योगीक शहर म्हणून ओळख असल्याने शहरातील व्यवसायिकांचे नियमित मुंबई, हैदराबाद, नागपूर आदी शहरात जाणे असते.
तपास सुरू आहे
जालना येथील रेल्वे स्थानकात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लुटमारीचा अद्यापही शोध लागलेला नाही. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तरी चोरट्याचा शोध घेण्यास साहाय्य झाले असते. अद्यापही या प्रकरणाचा शोध सुरु आहे. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही बसविल्यास अशा घटनांना आळा बसेल.
- दिलीप साबळे,
पोलीस निरीक्षक रेल्वे