जालन्यातील १३२ कोटींच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे थर्डपार्टी ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 06:16 PM2021-10-22T18:16:48+5:302021-10-22T18:17:18+5:30
१३२ कोटी रुपयांची अंतर्गत पाणीपुरवठा करण्याची योजना तीन वर्षांत ठाणे येथील कंत्राटदाराने पूर्ण केली.
जालना : शहरातील अंतर्गत जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ही योजना १३२ कोटी रुपयांची होती. त्यातून ९ जलकुंभ उभारून जवळपास ४४१ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. यामुळे शहरातील गल्लीबोळांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. या योजनेचे थर्डपार्टी ऑडिट नांदेड येथील तज्ज्ञांच्या पथकाकडून करण्यात येत आहे.
जालना शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी २०१२ मध्ये आ. कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकारातून २५० कोटी रुपये खर्च करून पैठण येथील जायकवाडी धरणातून पाईपलाईन टाकून पाणी योजना पूर्ण केली होती; परंतु या योजनेतून गावाच्या वेशीपर्यंत पाणी आले होते. हे पाणी शहरातील विविध भागांमधील नागरिकांना योग्य दाबाने मिळण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी १३२ कोटी रुपयांची अंतर्गत पाणीपुरवठा करण्याची योजना आखली होती.
ही योजना तीन वर्षांत ठाणे येथील कंत्राटदाराने पूर्ण केली. त्यात शहराच्या विविध भागात नऊ जलकुंभ उभारण्यासह पाईपलाईन टाकण्याचे काम होते. हे जलकुंभ मुख्य जलवाहिनीला जोडून हे पाणी सोडण्यात येणार आहे. या योजनेला पालिकेने तीन वेळेस मुदतवाढ दिली होती. कंत्राटदाराचे जवळपास १२० कोटी रुपयांचे बिलही देण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना आता लवकरच जालना पालिका हस्तांरित करून घेऊन योजनेतून पाणी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नांदेड येथील तज्ज्ञांच्या पथकाकडून सध्या योजनेचे थर्डपार्टी ऑडिट करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.