जालना जिल्ह्यात रोहयोच्या ७१४ कामांवर तेरा हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:16 AM2018-05-10T01:16:27+5:302018-05-10T01:16:27+5:30
जालना जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत.
सध्या कडक उन्हामुळे शेतातील कामांची संख्या मंदावली आहे. त्यामुळे अनेकजण हे रोजगाराच्या संधी शोधत आहेत. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेमुळे हक्काच्या रोजगाराची संधी मिळत असल्याने या कामावर जाण्यासाठी आता मजूरांची संख्या वाढली आहे. सध्या अकुशल कामाच्या माध्यमातून मोठी कामे केली जात आहेत. त्यात कृषी, वनविभाग तसेच गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे रोजगार हमी विभागाकडून सांगण्यात आले.
सद्यस्थितीत या मजूरांना दररोज २०३ रूपये प्रमाणे मोबदला दिला जात आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये रोजगार हमीच्या कामांवर ४२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यातील मजुरीपोटी जवळपास ९ कोटी ५१ लाख रूपये वाटप करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर ३० पेक्षा जास्त मजूर असतील त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी एका स्वतंत्र व्यक्तीला नेमण्यात येत आहे. तसेच मजूरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी देखील एका महिलेला नेमण्यात येऊन त्या महिलेलाही स्वतंत्र रोजगार दिला जात आहे.
एकूणच या विभागाकडून मागेल त्याला काम देण्यासाठीची आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. सध्या परतूर, मंठा आणि भोकरदन तालुक्यातून बऱ्यापैकी कामांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीचे पथक येणार
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेचे काम नेमके कसे सुरू आहे, याची चाचपणी करण्यासाठी दिल्ली येथून एक स्वतंत्र पथक गुडगव्हर्नस अंतर्गत येणार आहे. त्यात आता ज्या ठिकाणी काम सुरू असेल त्या ठिकाणी कामाचा तपशील असणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कामाचा पूर्ण तपशील तसेच येणारा खर्च आणि प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च याची माहिती द्यायची आहे.