'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

By संजय देशमुख  | Published: July 30, 2022 12:07 PM2022-07-30T12:07:13+5:302022-07-30T12:07:49+5:30

राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले.

'This reconciliation with Raosaheb Danven is the last'; Arjun Khotkar made it clear while going to the Shinde group | 'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

googlenewsNext

जालना: शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण हा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला आहे. या संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकाळी फोनवर बोलून परिवारावर असलेल्या संकटाची सविस्तर माहिती दिली. तसेच शिंदे गटात जात असल्याचे सांगितले. ही माहिती देताना अर्जुन खोतकर हे अत्यंत भावनिक झाले होते. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा असल्याचेची  त्यांनी नमूद केले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खोतकर म्हणाले, जालना लोकसभेवरील दावा अद्यापही सोडलेला नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही ते म्हणाले. एकूणच ईडी या संस्थेविषयी न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याने आपण जास्त बोलणार नाही. 

जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत आपण दिवाळी स्नेहमिलनामध्ये घोषणा केली होती. त्यानंतर सर्व घडलेला प्रकार तुमच्यासमोर असल्याचे ते म्हणाले. कारखान्यासह जालना तालुक्यातील हातवन प्रकल्प, जालना शहरातील रस्ते, पाणी या मुद्द्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. उद्या मुख्यमंत्री सिल्लोडला येत आहेत त्यांच्या सभेला आपण जाणार असल्याची घोषणाही खोतकरांनी केली. लवकरच शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

खा. दानवे यांच्या सोबत राजकीय समेट कितपत टिकू शकेल याबद्दल विचारले असता तो येणारा काळच ठरवेल, असे त्यांनी सांगितले. तसेच आताही दानवेंसोबतचा समेट शेवटचा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पी.एन.यादव, माजी जि.प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, मोहन अग्रवाल, पंडित भुतेकर, सुधाकर निकाळजे, आत्मानंद भक्त आदींची उपस्थिती होती.

Web Title: 'This reconciliation with Raosaheb Danven is the last'; Arjun Khotkar made it clear while going to the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.