अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट
By शिवाजी कदम | Published: September 25, 2023 05:45 PM2023-09-25T17:45:40+5:302023-09-25T17:46:07+5:30
अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट
- पवन पवार
वडीगोद्री:मराठा आरक्षण आंदोलन व पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर अंतरवाली सराटी हे गाव राज्यात गाजत आहे. आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या या गावात गावकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडत आहे. येथे पहिल्यांदाच एक गाव एक गणपतीची परंपरा सुरू करण्यात आली आहे. यावर्षी गावातील गणेशोत्सव व्यापक बनला असल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांचे साखळी उपोषण सुरू आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज बांधव येथे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी येथे येत आहेत. यानंतर उपोषणस्थळाच्या जवळच असणाऱ्या गणरायाचेही ते दर्शन घेतात. येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. रोज दोन वेळा गणरायाची आरती, भजन कीर्तनाचे कार्यक्रम येथे पार पडत आहेत.
अंतरवाली सराटी या गावाची ख्याती मनोज जरांगे - पाटील यांच्यामुळे सर्वदूर पसरली आहे. मनोज जरांगे यांनी १७ दिवस उपोषण केल्यानंतर आता साखळी उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जसे गाव एकत्र आले, त्याचप्रमाणे येथे पहिल्यांदाच एक गाव एक गणपती विराजमान झाले आहेत. यामुळे गावात शांतता असून, भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.
यावर्षी एकच गणपती
येथे पाच ते सहा सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन करण्यात येतात. यंदा आंदोलन सुरू असल्याने गावकऱ्यांनी एक गाव एक गणपती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे व साखळी उपोषणाला भेट देणारे मराठा बांधव गावातील गणरायाचे दर्शन घेत आहेत. ही आनंदाची बाब आहे.
- अनिल तारख, अध्यक्ष, सार्वजनिक गणेश मंडळ, अंतरवाली सराटी.
यावर्षीपासून परंपरा सुरु
आमच्या गावात दरवर्षी पाच ते सहा सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन होतात. परंतु, यावर्षी एक गाव एक गणपती ही परंपरा गावकऱ्यांनी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून येणारे मराठा समाज बांधव श्रींचे दर्शन घेत आहेत.
- राधाकिसन सुरासे, उपाध्यक्ष, सार्वजनिक गणेश मंडळ.