‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा करणे भोवले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:49 AM2019-04-04T00:49:32+5:302019-04-04T00:50:18+5:30
शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा, रेकॉर्ड अद्यावत न करणे, उशिरा येणे, महिन्याभरापासून गैरहजर राहणे या सर्व बाबी आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरोरा या सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. कामात हलगर्जीपणा, सतत गैरहजर राहणे व रेकॉर्ड मेन्टेन न करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उचला आहे. यासाठी त्यांनी महिनाभरापूर्वीच आठ अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. हे पथक दर आठवड्याला जिल्हाभरातील जि. प. शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींचा कारभार, रोजगार हमीची कामे, या सर्व बाबी तपासत आहे. या पथकाने आतापर्यंत १३८ ग्रामसेवक, १२ वैद्यकिय अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. दरम्यान, या पथकानेच जिल्हाभरातील काही शाळांची पाहणी केली असता, काही शाळांमध्ये अस्वच्छता, पोषण आहार गॅस ऐवजी लाकडाने शिजवणे, गैरहजर असणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. यात १ केंद्रपमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अरोरा यांनी दिली. यापुढेही अशा कामचुकार कर्मचा-यांवर जास्तीचे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
कुठे काय आढळले ?
घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील अर्जुननगर शाळेत शिक्षक उशारा आल्यामुळे त्यांची तात्पुरती वेतनवाढ बंद करण्यात आली आहे.
परतूर तालुक्यातील सोयंजना येथील शाळेत शालेय पोषण आहार योजनेची योग्यरीत्या अंमलबजावणी न करणे, रेकॉर्ड अद्ययावत न करणे.
परतूर तालुक्यातीलच वाटूर केंद्राचे केंद्रप्रमुख मागील महिन्याभरापासून गैरहजर असल्याचे आढळून आले.
जाफराबाद तालुक्यातील शिरोळा येथील मुख्याध्यापकांनी पोषण आहार शिजवण्यासाठी लाकडाचा उपयोग केला. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.