‘त्या’ कोंबड्या मानमोडी आजाराने दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:36+5:302021-01-22T04:28:36+5:30
जालना : बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथील कोंबड्यांचा मानमोडी आजाराने मृत्यू झाल्याचे प्राप्त अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे बर्ड फ्लूच्या ...
जालना : बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथील कोंबड्यांचा मानमोडी आजाराने मृत्यू झाल्याचे प्राप्त अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे बर्ड फ्लूच्या चिंतेतून पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अंबड तालुक्यातील महाकाळा व किनगाव येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल अप्राप्त आहे.
बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथील २१ कोंबड्यांचा गत आठवड्यात मृत्यू झाला होता. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घटनास्थळाची पाहणी करून तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. पुणे येथील प्रयोगशाळेकडून त्या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. ‘त्या’ कोंबड्यांचा मानमोडी आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यातील महाकाळा येथील २० व किनगाव येथील १४ अशा ३४ कोंबड्यांचा बुधवारी मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या दोन्ही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करण्यात आली आहे. पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल अप्राप्त आहे. दरम्यान, रोशनगाव येथील मयत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मानमोडी आजाराची चिंता कायम आहे.
अलर्ट झोन आदेशाला स्थगिती
रोशनगाव परिसरातील कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या परिसरातील तीन किलोमीटरच्या त्रिज्येत अलर्ट झोन जाहीर केला होता; परंतु रोशनगाव येथील कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या अलर्ट झोन आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.