"ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:16 PM2024-08-05T17:16:29+5:302024-08-05T17:18:23+5:30
मनोज जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
- पवन पवार
वडीगोद्री( जालना) : ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही, त्यांच्यावर काय बोलावं, असा टोला मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना लगावला.अंतरवाली सराटी येथे आज दुपारी पत्रकार परिषदेत जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.
जरांगे पुढे म्हणाले, मराठे फक्त हक्क मागत आहेत. तुमचा मित्र त्याला तुम्ही रोज भेटता, सागर बंगल्यावर जाऊन. त्याने मराठ्याचे, ओबीसी नेते विरोधात घातले. तो डोके भडकवत आहे, त्याला थोडा सांगा. मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू, असा सणसणीत टोला जरांगे यांनी राज ठाकरे यांना लगावला. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही जातीच्या मुद्द्यांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असे, राज ठाकरेनी सोलापूर मध्ये वक्तव्य केले होते.
नारायण राणे यांना सुनावले
अंतरवाली सराटीतील अनेक महिलांना गोळ्या लागल्या अजूनही त्या काठ्यावर चालतात. ते नाही दिसत का ९६ कुळी क्षत्रिय मराठ्याला. त्यांना देवेंद्र फडणवीसच दिसतो. तो २५ पोळ्या खातो दुधात चुरून. मी गोर गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो अन् तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठा व्हावा म्हणून लढता, अशी खरमरीत टीका जरांगे यांनी माजी मंत्री नारायण राणे यांच्यावर केली.
ईडबल्यूएस रद्द करण्यास कोणी सांगितले
ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये मुस्लिमांचा फायदा होत आहे हे यांचं दुखणं असून मी कधी म्हणलो मराठ्यांच ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करा. एसईबीसी दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात कुठेही गुलाल उधळला नाही. दहा टक्के आरक्षण मराठ्यांना मान्य नाही. ईडबल्यूएस रद्द करून मराठ्यांच सरकारने वाटोळ केल, असा आरोपही जरांगे यांनी केला.