शहीद सतीश पेहरे यांना हजारोंच्या उपस्थितीत मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 04:27 PM2020-07-17T16:27:04+5:302020-07-17T16:29:10+5:30
संपूर्ण वरूड (बु) व अमोना गावासह परिसरातील नागरिकांनी सतीष पेहरे यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
जाफराबाद : भारत- चीन सीमेजवळ अपघाती वीर मरण आलेल्या सैनिक सतीश सुरेश पेहरे यांना वरूड बुद्रुक (ता. जाफराबाद) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात आली. यानंतर पेहरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जाफराबाद तालुक्यातील वरूड (बु) येथील सतीश पेहरे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना लडाख येथील शोक नदीच्या पुलावर काम चालु असताना दरड कोसळून १४ जुलै रोजी रात्री पेहरे यांचे अपघाती निधन होऊन त्यांना वीर मरण आले होते. पेहरे यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथून वरूडला मोटारीने आणण्यात आले. यापूर्वी गुरूवारी रात्री लडाख येथून सुरेश पेहरे यांचे पार्थिव विशेष विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी वरुड (बु) येथील शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण वरूड (बु) व अमोना गावासह परिसरातील नागरिकांनी सतीष पेहरे यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी ‘शहीद सतीष पेहरे अमर रहे’, ‘परत या परत या’ ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणा उपस्थितांनी दिल्या. आप्तांचा आक्रोश वातावरणातील शांतता चिरत होता. तर अनेकांच्या डोळ््यांच्या कडा पाणावल्या होत्या. सतीष यांचे पार्थिव पाहताच त्यांच्या परिवाराचा आक्रोश पाहून हजारोंच्या संख्येतील सारेच गहिवरले. सतीष पेहरे यांना यावेळी उपस्थितांनि श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना या गावचे सतीश पेहरे होते. परिवारासह ते आपल्या मूळ गाव असलेल्या अमोना गावच्या लगतच असलेल्या जाफराबाद तालुक्यातील वरूड (बु) या गावी कुटुंबासह राहत होते.
यावेळी आ. संतोष दानवे, जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार सतीश सोनी, सपोनि अभिजीत मोरे, उपोनि युवराज पोठरे, तलाठी गजानन लहाने, ग्रामसेवक राजेंद्र परिहार, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, संतोष लोखंडे, विजय परीहार, सुरेश दिवटे, रामधन कळंबे, गोविंदराव पंडित, भाऊसाहेब जाधव, रविकांत तुपकर, दगडुबा गोरे, जगन पंडित, सरपंच वंदना सगट, नाना भागीले, अनिल बोर्डे, साहेबराव मोरे, उद्धव दुनगहु, राजू साळवे, प्रकाश गव्हाड, गजानन घाटगे, रमेश धवलीयाँ, कैलास दिवटे, दीपक बोराडे, कुंडलीक मुठ्ठे, व्ही.एम. आनळकर, सयदा फिरास्त, एस.एस. सोनुने, भास्कर पडघन, मयुर बोर्डे, अनुभव जैन आदींची उपस्थिती होती.