घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:03 AM2019-05-22T01:03:54+5:302019-05-22T01:03:56+5:30
भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
विजय बावस्कर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : भोकरदन तालुक्यातील वरुड बु.गावात पाणीटंचाईचा कहर झाला आहे. घोटभर पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून मृत्यूच्या दारात उभे राहून, पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
सध्या शेतात कामाचे दिवस असल्याने संपूर्ण दिवस येथील नागरिकांना पाणी आणण्यात घालावा लागत आहे. टँकर आल्यावर संपूर्ण गाव या विहिरीवर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी करते. विशेष म्हणजे गावात तीन दिवसांपासून टँकर आले नाही. तसेच परिसरात देखील तीन किलोमीटर अंतरावर कुठेच पाणी नसल्याने वरुड बु.गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे.
वरुड बु. गावातील लोकसंख्या चार हजारांच्यावर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीकडून अपुऱ्या उपाययोजना केल्या असल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप येथील महिला व पुरुषांनी केला आहे.
गावाला दानापूर येथील जुई धरणातील खोदण्यात आलेल्या विहिरीवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, धरण आटल्याने या विहिरीने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. सध्या गावात एक सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर आहे.
या विहिरीत पद्मावती धरणातून गावासाठी सुरू केलेल्या एका शासकीय टँकरद्वारे पाणी टाकले जाते. त्याची देखील एकच खेप होते. टँकर येणार असल्याची माहिती मिळताच गावातील पुरूष, महिला व लहान मुले या विहिरीवर एक तास अगोदरच येऊन बसतात. टँकर आल्यावर हे टँकर सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत सोडल्यावर मात्र, पाणी भरण्यासाठी महिला व पुरुषाची या ठिकाणी स्पर्धा लागते. अनेक वेळा या ठिकाणी पाणी काढताना वाद देखील झाले आहेत. संपूर्ण गाव एकाच विहिरीवर पाणी भरत असल्याने अनेकांना पाण्याविनाच आपले रिकामे भांडे घेऊन परतावे लागत आहे. गावात गेल्या दोन महिन्यापासून एकच टँकर सुरू आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत हे टँकर अपुरे पडत असल्याने ग्रामपचांयतीने वाढीव टँकरचा प्रस्ताव पाठविणे गरजेचे होते. मात्र, येथील ग्रामपंचायतीने तसे केले नसल्यामुळे गावातील महिला व पुरुषांना घोटभर पाण्यासाठी मृत्यूशी खेळावे लागत आहे. गावात तीन दिवसांपासून पाण्याचे टँकर नसल्याने नागरिकांना भर उन्हात कोसो दूर जाऊन. डबक्यातील पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातून देखील आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
१९७२ पेक्षाही भयानक दुष्काळाचा अनुभव : पाणी नेऊ नये म्हणून विहिरी झाकल्या
भोकरदन तालुक्यात १९७२ पेक्षा ही भयानक दुष्काळाचा अनुभव येथील जनता घेत आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई उग्ररुप धारण करु लागली आहे. अनेकांनी तर आपल्या विहिरीवरून कुणी पाणी नेऊ नये म्हणून विहिरीवर लोखंडी पत्रे टाकून विहीर झाकली आहे. यामुळे पाणी आणावे तरी कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्याच्या शोधात गोकुळ व मालखेडा येथील दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला होता. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. वरुड बु.गावात मुस्लिम बांधवांची जवळजवळ तीस घरे आहेत. सध्या मुस्लिम बांधवाचा पविञ रमजान महिना असल्याने सर्वांनी रोजा धरला आहे.
एकीकडे कडाक्याचे ऊन तर दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम महिलांना विहिरीवर पाणी काढण्यासाठी जावे लागत आहे.माञ, त्यांना त्या ठिकाणी पाणी काढताना ग्लानी येऊ लागली आहे.त्यामुळे मुस्लिम वर्गातून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याच्या प्रतिक्रिया वरुड बु,येथील हसनूरबी शेख यांनी व्यक्त केली.