साडेतीन कोटींचा टंचाई कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 08:59 PM2020-01-14T20:59:37+5:302020-01-14T21:00:16+5:30
जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा सादर केला
जालना : जानेवारी ते जून या कालावधीतील जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. यात नळ योजना विशेष दुरूस्तीचे ४४ प्रस्ताव प्रस्तावित करण्यात आले आहेत.
गतवर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने जालना तालुक्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये सध्या पाणीसाठे उपलब्ध आहेत. मात्र, मार्च-एप्रिल नंतर काही प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समिती प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून आढावा घेतला होता. या आढाव्यानंतर जानेवारी ते जून २०२० या कालावधीतील संभाव्य टंचाई पाहता ३ कोटी ४४ लाख २२ हजार रूपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
यात १३८ गावे, १२ वाड्यांवर १५० नवीन विंधन विहिरी घेणे, ३७ गावे आणि ७ वाड्यांमधील ४४ नळ योजना विशेष दुरूस्ती करणे, ६ गावे आणि ४ वाड्यांमध्ये १० तात्पुरत्या पूरक योजना घेणे, १०० गावे व ४३ वाड्यांसाठी १४३ खासगी विहीर अधिग्रहण करणे, १६ गावे एका वाडीसाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाय प्रस्तावित करण्यात आले आहेत. या उपायांसाठी अंदाजित खर्च ३ कोटी ४४ लाख २२ हजार रूपये येणार आहे. शहरी भाग वगळता तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश जलस्त्रोतात पाणीसाठा आहे. शिवाय हातपंप, गावातील कूपनलिकांनाही सध्या मुबलक पाणी आहे. पुढील मार्च-एप्रिलमध्ये निर्माण होणा-या संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंचायत समिती प्रशासनाने हा टंचाई आराखडा वरिष्ठ पातळीवर दाखल केला आहे.
टँकरसाठी लागणार १ कोटी
प्रस्तावित योजनांमध्ये नवीन विंधन विहिरींसाठी ७५ लाख रूपये, नळ योजना विशेष दुरूस्तीसाठी ८४.५० लाख रूपये, तात्पुरती पूरक योजना घेण्यासाठी २५.५० लाख रूपये, खाजगी विहीर अधिग्रहणासाठी ७७.३२ लाख रूपये, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी २ लाख रूपये असा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
टंचाई होऊ नये म्हणून दक्षता
संभाव्य पाणीटंचाई आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक दक्षता घेतली जाते. याचाच एक भाग म्हणून विविध प्रस्तावित योजनांचा साधारणत: सव्वा तीन कोटींचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
संजय कुलकर्णी
गटविकास अधिकारी, जालना