जालना जिल्ह्यातील साडेतीन हजार शिक्षकांची होणार कोरोनाची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 07:25 PM2020-11-20T19:25:20+5:302020-11-20T19:26:32+5:30
जिल्ह्यातील ५२३ शाळांत ९ ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत.
जालना : शाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ३ हजार ७७९ शिक्षकांची चाचणी केली जाणार असून, शिक्षण विभागाकडून तसे नियोजन करण्यात आले आहे. ही चाचणी सर्वांनी करणे बंधनकारक असून, त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्ह्यातील ५२३ शाळांत ९ ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत. या वर्गांना शिकविणाऱ्या १० हजार शिक्षकांची १७ ते २१ नोव्हेंबरपर्यंत आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. पुढील १७ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दर दिवसाला २०० ते ३०० शिक्षकांच्या तपासण्या करून त्यांचे अहवाल देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी बैठकांवर बैठका पार पडत आहेत. शिक्षण आयुक्त विशाल सोळुंके यांनी नुकतीच तयारीची आढावा बैठक घेतली. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामंपचायतींना पंचायत विभागाकडून साहित्य उपलब्धतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकाच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्याला प्रवेश
कोरोनामुळे अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास नकार देत होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता बहुतांश पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार आहेत; परंतु खबरदारी म्हणून शासन पालकांकडून संमतीपत्र भरून घेत आहेत. संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही.
शिक्षकांच्या कोरोना चाचणीला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अँटिजन न करता आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. दररोज २०० चाचण्या करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहेत.
- नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी
तालुकानिहाय शिक्षकांची संख्या
तालुका शिक्षक संख्या
जालना १,०७६
बदनापूर २८१
अंबड ३७९
घनसावंगी २८२
परतूर ३४८
मंठा २५९
भोकरदन ७९६
जाफराबाद ३५८