तीन कोटींचा वाळूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:33 AM2017-12-06T00:33:38+5:302017-12-06T00:33:47+5:30

भोकरदन/केदारखेडा: तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारनंतर पिंपळगाव ...

Three crore sand stock seized | तीन कोटींचा वाळूसाठा जप्त

तीन कोटींचा वाळूसाठा जप्त

googlenewsNext

भोकरदन/केदारखेडा: तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारनंतर पिंपळगाव सूळ शिवारातील गिरजा-पूर्णा नदीपात्रात छापा टाकला. पथकाने दोन कोटी ८० लाख रुपये किमतीचा तब्बल सात हजार ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
वालसा डावरगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रातील वाळू लिलावाबाबत ग्रामसभा घेण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे सकाळी गावात गेल्या होत्या. ग्रामस्थांनी त्यांना गिरजा-पूर्णा नद्यांच्या संगमावरील महादेव मंदिराजवळ होत असलेल्या वाळू उपशाबाबत माहिती दिली. तहसीलदार कोल्हे काही कर्मचा-यांना सोबत घेऊन गिरजा नदी पात्रात गेल्या असता वाळू माफियांनी जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्र अक्षरश: पोखरल्याचे दिसून आले. कोल्हे यांनी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपविभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी यांना माहिती दिली. त्यानंतर केदारखेडा, हसनाबाद, राजूर या भागातील मंडळ अधिकारी, तलाठी अशा १५ अधिका-यांचे पथक नदीपात्रात पोहोचले. हसनाबाद ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनाही बोलावण्यात आले. पोलीस बंदोबस्तात नदीतील वाळू साठ्याच्या मोजमापाला सुरुवात झाली. मोजमापाच्या या कामास तब्बल सात तास लागले. हा वाळूसाठा सात हजार १२ ब्रास असून, त्याची किंमत २ कोटी ८० लाख रुपये असल्याचे तहसीलदार कोल्हे यांनी सांगितले. महसूलच्या पथकाने सायंकाळी दोन जेसीबीच्या मदतीने वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणा-या चोरट्या रस्त्यांवर चा-या खोदून सर्व रस्ते बंद केले.
--------
वाळू माफियांनी शोधली संधी
विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेनिमित्त मागील आठवड्यात तहसीलदार योगिता कोल्हे यांची जालना येथे आठवड्यासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी घेत केदारखेडा, देऊळगाव ताड, पिंपळगाव सूळ शिवारात नदीपात्रातून वाळू उपशाचा सपाटा लावला. मात्र, वालसा डावरगाव येथील ग्रामसभेच्या निमित्ताने या वाळूचोरीचा भांडाफोड झाला.
------------
लिलाव होईपर्यंत वाळूसाठ्याचे संरक्षण
जप्त करण्यात आलेल्या या वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव होईपर्यंत वाळू साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस व महसूल विभागाच्या दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये मंडळ अधिकारी संजय दिघे, शिवाजी गारोळे, ठोंबरे हे दिवसा तर अन्य एक पथक रात्री वाळूसाठ्याचे संरक्षण करणार आहे. वाळूचोरी करण्यासाठी ज्या शेतकºयांनी आपल्या शेतातून रस्ता तयार करून दिला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

Web Title: Three crore sand stock seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.