जालन्यात काँग्रेस पदाधिका-यांचे तीन दिवसीय शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:37 PM2018-01-22T23:37:33+5:302018-01-22T23:37:51+5:30
जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल बगडियामध्ये ३० जानेवारीपासून होणा-या या कार्यशाळेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे मार्गदर्शन करणार आहेत.
जालना : जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल बगडियामध्ये ३० जानेवारीपासून होणा-या या कार्यशाळेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोरंट्याल म्हणाले की, काँग्रेसच्या या शिबिरात आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.प.सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेलचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. काँग्रेसची आजची भूमिका आणि पक्षाचे धोरण यावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाईल. शहरासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून चोखपणे काम करीत आहे. याचीच धास्ती भाजप नेत्यांनी घेतली असून, सत्तेचा दुरुपयोग करीत नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण खेळले जात आहे. नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखविले जात आहे. नैतिकतेचा वारसा सांगणाºया या पक्षाच्या नेत्यांनी सर्व नैतिकता धाब्यावर बसविल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना त्याच वॉर्डातून निवडून आणून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसे न झाल्यास या नेत्यांनी राजकारण सोडून द्यावे. नाही तर आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हान गोरंट्याल यांनी दिले. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राम सावंत, शेख महेमूद, माजी नगरसेवक वैभव उगले, विनोद यादव आदी उपस्थित होते.
.................................
रावसाहेब दानवेंनी भूमिका स्पष्ट करावी...
जालना-जायकवाडी योजनेवर केवळ जालन्याचा हक्क असताना अंबडचा हिस्सा मागितला जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे गोरंट्याल म्हणाले. अंबड पालिकेचे थकित वीजबिल जालन्याने का भरावे, असा सवालही त्यांनी केला.
....................................
पक्ष सोडणा-यांवर कारवाई
काँग्रेस पक्ष सोडून भाजपत जाणा-या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. पक्षाचा व्हीप त्यांना बजावण्यात येणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. याबाबतचे पत्र जिल्हाधिका-यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
.......................