यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू

By विजय मुंडे  | Published: December 20, 2023 07:27 PM2023-12-20T19:27:34+5:302023-12-20T19:29:59+5:30

भरधाव कारचा वरील पत्रा फाटल्याने कार कंटेनरच्या खाली घुसली.

Three died, including an uncle-niece in car and contained crash | यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू

यात्रेसाठी ताईला आणण्यास निघालेल्या भावावर काळाचा घाला; काका-पुतणीसह तिघांचा मृत्यू

वडीगोद्री (जि.जालना) : खंडोबा यात्रेसाठी ताईला गावाकडे आणण्यास निघालेल्या युवकासह त्याची पुतणी व मित्राचा भरधाव कार कंटेनरखाली घुसल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील अंकुशनगर येथे बुधवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडला. कंटेनरखाली गेलेली कार जेसीबीच्या सहाय्याने ओढून काका-पुतणीसह त्याच्या मित्राचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अमोल कैलास जाधव (वय २५- रा. बक्षाचीवाडी ता. अंबड), ओंकार बळीराम गायकवाड (वय २१), माऊली (माऊ) संभाजी गायकवाड (वय १०, दोघे रा. पिंपरखेड) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. अंबड तालुक्यातील चिंचखेड येथे खंडोबाची यात्रा भरते. त्यामुळे ओंकार गायकवाड हा सासरी असलेल्या बहिणीला आणण्यासाठी पुतणी माऊ गायकवाड व मित्र अमोल जाधव यांच्यासमवेत बुधवारी दुपारी कारने (क्र.एम.एच.२०- बी.एन.७०७३) मस्ला (ता.गेवराई) येथे जात होता. त्यांची कार अंकुशनगर येथील समर्थ कारखान्यासमोरील पुलावर आली व रस्त्याच्या कडेला असलेल्या कंटेनरला (क्र.एच.आर.३८- डब्ल्यू.९२१४) पाठीमागून धडकली.

भरधाव कारचा वरील पत्रा फाटल्याने कार कंटेनरच्या खाली घुसली. घटनास्थळी महामार्गाचे मदतनीस महेश जाधव, हितेश नाटकर यांनी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने कार कंटेनरच्या बाहेर काढली. त्यानंतर आतील मृतदेह काढून रुग्णवाहिकेद्वारे अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळाला गोंदी ठाण्याचे सपोनि. रवींद्र ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाहणी केली. कंटेनर ताब्यात घेऊन शहागड चौकीत लावण्यात आला. अपघातात काका-पुतणी व मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बक्षाचीवाडी व पिंपरखेड गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

रुग्णालयात नातेवाईकांचा हंबरडा
बहिणीला आणण्यासाठी जाणाऱ्या गायकवाड कुटुंबातील युवकासह मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती कळताच अंबड जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली. बक्षाचीवाडी येथील मयत युवकाचेही नातेवाईक व मित्र परिवार अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता.

Web Title: Three died, including an uncle-niece in car and contained crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.