जालना जिल्ह्यात गणेश विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 10:40 PM2020-09-01T22:40:43+5:302020-09-01T22:41:37+5:30
बदनापूर आणि जालना जिल्ह्यातील घटना
जालना : जिह्यात जालना आणि बदनापूर तालुक्यात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजता सारवाडी (ता. जालना) शेत- शिवारातील तलावात सिद्धार्थ रवींद्र वाघमारे (20) व सौरव देवेन्द्र जैस्वाल (20) या दोघांचा तर बदनापूर तालुक्यातील अनवी राळा येथील कैलास हरिभाऊ राठोड(42) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
नवीन जालना भागातील कादराबाद येथील सिद्धार्थ व सौरव हे दोघे तरुण मंगळवारी सायंकाळी घरातील गणेश विसर्जन करण्यासाठी मित्रांसोबत सारवाडी शेत- शिवारात गेले होते. दरम्यान गणेश विसर्जन करताना सौरव व सिद्धार्थ पाण्यात बुडाले. उपस्थितांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु दोघांनाही डॉक्टरांनी मयत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या वृत्ताला जालना तहसीलदार श्रीकांत भुजबळ व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे.तसेच बदनापूर तालुक्यातील अनवी राळा येथील कैलास हरिभाऊ राठोड(42) हे गणेश विसर्जन करताना विहिरीत पडले आणि पाण्यात बुडाले. त्यांना काही नागरिकांनी बाहेर काढले,मात्र त्यांचा मृत्यू झाला.