तीन तासांची शोधमोहीम; युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:12 AM2020-01-23T01:12:04+5:302020-01-23T01:13:45+5:30
जालन्याजवळील नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका साठवण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : जालन्याजवळील नागेवाडी शिवारातील आरटीओ कार्यालय परिसरात असलेल्या एका साठवण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघड झाली. मंगळवारी सायंकाळी तीन मित्र हे तळ्यावर फ्रेश होण्यासाठी गेले होते, पैकी एका युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. रात्री अंधार झाल्याने त्या युवकाचा मृतदेह काढता आला नाही. बुधवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने तीन तास तळ्यात शोध घेऊन त्या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
या विषयी चंदनझिरा पोलीसांनी दिलेली माहिती अशी, भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील तीन तरूण हे मंगळवारी आरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आले होते. सायंकाळी हे तिघेही आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या साठवण तलावाजवळ फ्रेश होण्यासाठी गेले होते. अनिल गजानन फुके (वय २५) सुनील बर्डे आणि विलास बर्डे हेही त्याच्या सोबत होते. अनिल फुके हा तळ्यात आत खोलवर गेल्याने त्यात बुडला होता. तो बुडत असतांना त्यांच्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. परंतु तो पर्यंत पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता.
मंगळवारी सायंकाळी चंदनझिरा पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु अंधार पडल्याने बुधवारी सकाळीच पुणे येथून आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. या पथकाने बोटीच्या मदतीने अनिल फुकेच्या मृतदेहाचा तब्बल तीन तास शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह बारा वाजेच्या सुमारास हाती लागला. बुधवारी सकाळी नऊ वाजता शोधकार्य सुरू करण्यात आले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ.) ची पाचवी वाहिनी पुणे येथील कमांडर महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एम.नवले, व्ही.जोगाराव, हरिहर घुले, विकास राऊत, प्रमोद पाटील, समाधान खैरनार यांच्यासह सोळा जवानांची टीम हा मृतदेह शोधण्यासाठी दाखल झाली होती.
या जवानांनी पाण्यात उतरून आॅक्सिजनच्या सहाय्याने बुडी घेऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. यादरम्यान मृतदेह शोधण्यासाठी आॅक्सिजनचे तीन सिलेंडर लागल्याचे सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मयत अनिल फुकेचे शवविच्छेदन करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वीच जालना तालुक्यातील कुंभेफळ येथे तळ्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला होता.