तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:34 PM2022-05-14T19:34:30+5:302022-05-14T19:34:53+5:30

वाढोणा शिवारातील घटना : प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही.

Three hours of trembling and the leopard outside the well | तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली

तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली

Next

जालना : विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. तीन तासांच्या थरारक कसरतीनंतर झाडाच्या फांद्यावर चढून तो बिबट्या विहिरीबाहेर पडला. ही घटना शुक्रवारी वाढोणा (ता.भोकरदन) शिवारात घडली.

वाढोणा शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शुक्रवारी सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पवार यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. खलसे, वनपाल ए.ए. राठोड, मांटे, पचलोरे, बुरकुले यांच्यासह सर्व वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच औरंगाबादेतील वनविभागाची शीघ्रकृती दलाची टीमही घटनास्थळी धावली. विहीर उथळ आणि पंधरा फूट खोल होती. शिवाय विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा टाकणेही अवघड होते. यामुळे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला मोठी कसरत करावी लागली. विशेषत: प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विहिरीच्या शेजारी असलेले झाड तोडून विहिरीमध्ये आडवे केले. झाड विहिरीमध्ये आडवे करताच तो बिबट्या झाडाच्या फांद्यांवर चढून विहिरीबाहेर आला. विहिरीबाहेर आलेला बिबट्या हा वनक्षेत्राकडे धावून गेला. यावेळी वाढोणा व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी भटकंती
सध्या उन्हाचे चटके वाढले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे दिसून येते. हा बिबट्या पाण्याच्या शोधार्थ येऊन विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाढोणा शिवारासह अजिंठाच्या डोंगररांगांमधून हा बिबट्या वाढोणा शिवारात आल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.

महिनाभरातील दुसरी घटना
महिनाभरापूर्वीच जाफराबाद तालुक्यातील काळेगाव शिवारातील विहिरीत एक बिबट्या पडला होता. या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला कसरत करावी लागली. त्यानंतर आता वाढोणा शिवारात हा बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. वन्य प्राण्यांची भटकंती थांबविण्यासाठी वनक्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता करणे गरजेचे आहे.

Web Title: Three hours of trembling and the leopard outside the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.