वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:34 AM2018-09-29T00:34:08+5:302018-09-29T00:34:37+5:30
भरधाव वेगातील इंडीका कार दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला पलटी होवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाणेगाव पाटीजवळील दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भरधाव वेगातील इंडीका कार दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला पलटी होवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाणेगाव पाटीजवळील दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमींना उपचारासाठी जालन्याला हलवण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, जीप कार (क्रमांक जी.जे.0५ई क्यू ८८७२) ही भोकरदनहून भरधाव वेगाने राजूरकडे येत असताना एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे इंडिका कार बाणेगाव पाटी जवळील पडोळवस्ती जवळ रस्त्याच्या बाजूला उलटली. यामधे धर्मेश कोटरिया (रा.सूरत) हा जागीच ठार झाला तर गाडीतील सतिश जैस्वाल, गोपाल जैस्वाल (दोघे रा.पारेगाव, मध्यप्रदेश) हे जखमी झाले. अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी मदत करून जखमींना तातडीने रूग्णवाहीकेतून जालन्याला हलवले. अपघाताची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हयाची नोंद झाली नव्हती.
गेल्या काही महिन्यांपासून जालना ते भोकरदन या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी हा रस्ता चांगला असल्याने अपघात कमी होत, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
जीपच्या धडकेत युवक ठार
मानदेऊळगाव : जालना राजूर रस्त्यावरील तांदूळवाडी फाट्याजवळ एका बोलेरो गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. यात एका युवकाचा मुत्यू झाला. तर दोन वर्षांचा मुलगा जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाला.
सतीश शेषराव दाभाडे (२६, रा. चिंचोली ता. भोकरदन ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रेम दीपक दाभाडे हा दोन वर्षांचा चिमुकला यात जखमी झाला आहे. सतीश दाभाडे हे आपल्या चुलत भावाच्या दोन वर्षांच्या मुलासोबत दुचाकीने (एम.एच. २१. बी. जी. ७६३७) आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी जात असतांना बोलोरो (एम. एच. २१. एल. ४२७) या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. यात सतीश दाभाडे हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असलेला दोन वर्षांचा चिमुकला जखमी झाला. त्या चिमुकल्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, बोलेरो ही गाडी भोकरदन गटविकास अधिकाऱ्यांची असून, या गाडीतून चालक अणि लिपिक महत्वाचे कागदपत्रे घेऊन जालन्याकडे येत होते. अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोउपनि. गिरासे, पो. कॉ. वाघ, मतकर, जोशी, लहाने आदी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.