विविध अपघातांत तिघांचा मृत्यू; महामार्गावर झाली वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 01:08 AM2020-02-04T01:08:38+5:302020-02-04T01:08:55+5:30
जालना- मंठा रोडवर सोमवारी रात्री दोन अपघात झाले. यात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह दोघांचा मृत्यू झाला. तर रोहनवाडी- सारवाडी मार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना- मंठा रोडवर सोमवारी रात्री दोन अपघात झाले. यात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह दोघांचा मृत्यू झाला. तर रोहनवाडी- सारवाडी मार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.
जालना पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश नरवडे (वय- ४५ रा. एरंडवडगाव) हे सोमवारी रात्री जालना- मंठा रोडवरून दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी गीता आॅईल मिल जवळ आली असता अपघात झाला. या अपघातात गणेश नरवडे यांचा मृत्यू झाला. तर या अपघातानंतर काही वेळातच जालना- मंठा मार्गावर दुचाकी अपघात झाला. यातील गंभीर जखमी सुरेश खांडेभराड (वय-४० रा.घोडेगाव ता. जालना) यांचा मृत्यू झाला. यापूर्वी महामार्गावर झालेला अपघात पाहून खंडेभराड हे पुढे जात होते. मात्र, वन-वेमध्ये समोरून आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याचे समजते. तर तिसरा अपघात रोहनवाडी- सारवाडी मार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला. ट्रॅक्टर- दुचाकी अपघातात ज्ञानेश्वर बबनराव निंबाळकर (वय-३२ रा. सारवाडी) यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.