गव्हाची अवैध वाहतूक केल्या प्रकरणात तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:02 AM2020-03-03T00:02:21+5:302020-03-03T00:03:40+5:30
भोकरदन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा गहू पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा गहू पकडला असून, या प्रकरणात गहू मालक, ट्रक मालकासह चालकाविरूध्द सोमवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांना लागला नव्हता.
सिल्लोड- भोकरदन मार्गावरील नांजा पाटीजवळ रविवारी मध्यरात्री भोकरदन पोलिसांनी एका ट्रकवर (क्र.एम.एच.१५- सी. के. २३८९) कारवाई केली होती. यावेळी स्वस्त धान्य दुकानातील २ लाख ६६ हजार २५० रूपये किंमतीचा ३५५ पोती गहू जप्त करण्यात आला होता. ट्रकसह १२ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोनि दशरथ चौधरी यांच्या तक्रारीवरून गहू मालक, ट्रक मालकासह चालकाविरूध्द सोमवारी पहाटे जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी असलेला चालक फरार झाला कसा आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत एकाही आरोपीचा पत्ता पोलिसांना लागला नाही कसा ? असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये, पोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बी़बी़ वडदे हे करीत आहेत.
गहू जळगावमधील असल्याची चर्चा
भोकरदन पोलिसांनी पकडलेली गव्हाची ट्रक ही जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गहू जर चोपडा येथील असेल तर ट्रकमधून तो गहू भोकरदन परिसरात आला कसा ? त्याची जालना किंवा इतर ठिकाणच्या काळ्या बजारात विक्री होणार होती का ? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत असून, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांकडून पाहणी
भोकरदन पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील गव्हाच्या ट्रकवर कारवाई केल्याने पुरवठा विभागातही खळबळ उडाली आहे. पुरवठा विभागाच्या वतीने आपापल्या गोडाऊनमधील माल सुरक्षित आहे का याची चाचपणी करण्यात आली. सहायक पुरवठा अधिकारी उघडे व त्यांच्या पथकाने भोकरदन येथील गोडाऊनलाही भेट देऊन तपासणी केली. मात्र, केवळ माल पकडला तरच पुरवठा विभाग गोडाऊनची तपासणी कशी काय करते ? हाच प्रश्न आहे.