जिलेटिन कांड्या विक्री प्रकरणी विद्यार्थ्यासह तीन जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:41 AM2018-02-22T00:41:48+5:302018-02-22T00:41:52+5:30
मुंबईच्या डोंबिवली भागात जिलेटिन कांड्या (स्फोटक तोटे) विक्री प्रकरणात मुंबई पोलिसांनी येथील तीन तरुणांना मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. यातील एकजण बारावीचा विद्यार्थी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबईच्या डोंबिवली भागात जिलेटिन कांड्या (स्फोटक तोटे) विक्री प्रकरणात मुंबई पोलिसांनी येथील तीन तरुणांना मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. यातील एकजण बारावीचा विद्यार्थी आहे. परीक्षा संपताच पोलिसांनी त्यास जामवाडी येथून अटक केली.
या संदर्भात डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चरमाळे यांनी सांगितले, की डोंबिवली भागातील एका संशयिताकडून पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोनशे जिलेटिन कांड्या जप्त केल्या होत्या. चौकशीत संशयिताने जिलेटिनच्या या कांड्या जालन्यातून खरेदी केल्याचे समोर आले. या प्रकरणात येथील विकास मोकळे (२२ रा. कसबा,जालना) याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे रामनगर ठाण्याचे पाच जणांचे एक पथक मंगळवारी सकाळी जालन्यात दाखल झाले. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर सकाळी कसबा परिसरातून विकास मोकळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अंकुश लक्ष्मण डोके (२१ फुलेनगर, जामवाडी) व पिंटू काळे (२३ जामवाडी) यांच्याकडून जिलेटीन कांड्या खरेदी केल्याचे सागितले. त्यानंतर पथकाने तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपनिरीक्ष प्रल्हाद सानप, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी.टी. कणखर यांच्यासोबत जामवाडी येथे पोहोचले. त्या वेळी संशयित अंकुश डोके हा येथील एका महाविद्यालयात बारावीचा पेपर सोडत होता. त्यामुळे येथील शिक्षकांनी पथकास पेपर संपल्यानंतर कारवाई करण्याची विनंती केली. दुपारी पेपर संपताच पोलिसांनी अंकुश डोके यास ताब्यात घेतले.
या प्रकारामुळे गावात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. त्यानंतर पिंटू व विकास मोकळे यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. तिघांनाही तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कारवाईशी संबंधित आवश्यक माहिती दिल्यानंतर मुंबईचे पथक तिघांना घेऊन सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले.
जालना तालुक्यातील धावेडी शिवारात एका व्यक्तीचे ब्लॉस्टिंग घेण्यासाठी वापरण्यात येणाºया जिलेटिन कांड्या साठविण्याचे परवानाधारक गोदाम आहे. संशयित पिंटू काळे याचा खदाणीचा तसेच, ब्लॉस्टिंग घेण्याचा व्यवसाय आहे. त्याने या गोदामातून जिलेटिन विकत घेतल्यानंतर ते मुंबईला विक्री केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.