दोन मोटारसायकलींच्या अपघातात तीन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:43 AM2019-01-02T00:43:47+5:302019-01-02T00:44:18+5:30
दोन मोटारसायकलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन (जि. जालना) : दोन मोटारसायकलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. भोकरदनमधील हसनाबाद-खादगाव पाटीजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. मृतांमध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे.
३१ डिसेंबर रोजी शेरखान मोहम्मदखान पठाण (५६) हे मुलगा जुबेरखान शेरखान पठाण (२८) याच्यासह दुचाकीने (एम.एच.२१,००८५) औरंगाबादहून हसनाबादकडे येत होते. तर योगेश कडुबा जाधव (२५), योगेश काकासाहेब मानकापे (२४) आणि रवि बन्सीधर मते (२०, सर्व रा. जातेगाव, ता. फुलब्री) हे दुचाकीवरून (एम.एच.२०, ईएक्स १६९८) फुलब्रीकडे जात होते. हसनाबाद ते तळेगाव मार्गावरील खादगाव पाटीजवळ दोन्ही दुचाकी भिडल्या. यात शेरखान मोहम्मदखान पठाण व त्यांचा मुलगा जुबेरखान शेरखान पठाण हे दोघे पिता-पुत्र जागीच ठार झाले. तर दुसऱ्या दुचाकीवरील जखमी झालेल्या योगेश जाधव याचा औरंगाबादमध्ये रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे निरिक्षक किरण बिडवे, उपनिरिक्षक जी़एस़ पठाण, कर्मचारी उत्तम देशमुख, शेख जिलाल, सुभाष चव्हाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना हसनाबाद येथील आरोग्य केद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी अरूण मुळे यांनी शेरखान मोहम्मदखान पठाण, जुबेरखान शेरखान पठाण यांना मृत घोषित केले. इतर तीन जखमींना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबादला हलविण्यात आले. यात योगेश जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर औरंगाबादेतील घाटीत उपचार सुरू आहेत. मृत पिता-पुत्रावर मंगळवारी हसनाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मयत योगेश जाधव यांच्यावर जातेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.