खून प्रकरणात तीन जणांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:14 AM2018-06-21T01:14:51+5:302018-06-21T01:14:51+5:30
जालना तालुक्यातील रेवगाव येथे भगवान शंकर कुमकर यांच्या डोक्यात दगड घालून तीन जणांनी खून केला होता. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना तालुक्यातील रेवगाव येथे भगवान शंकर कुमकर यांच्या डोक्यात दगड घालून तीन जणांनी खून केला होता. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली असून, दहा हजार रूपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
रेवगाव येथील रहिवासी मयत भगवान कुमकर (वय ६५) हे ६ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी शेतातून बैलगाडीने घरी येत असताना त्यांना रस्त्यात अडवून तू जादूटोणा का करतो अशी विचारणा करत थेट त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून एकनाथ उर्फ सोमनाथ भानुदास कुमकर, जगन्नाथ भानुदास कुमकर आणि भगवान आसाराम कुमकर यांनी केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर बुधवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. प्रधान यांनी खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेसह दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची सक्तमजूरीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. दीपक कोल्हे यांनी बाजू मांडली.