परतूर पोलीस ठाण्यात सात महिन्यांत तीन पोलीस निरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:13 AM2019-09-16T00:13:25+5:302019-09-16T00:13:49+5:30
पोलीस ठाण्याचा कारभार मागील सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांच्या हाती देण्यात आला आहे.
शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : येथील पोलीस ठाण्याचा कारभार मागील सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांच्या हाती देण्यात आला आहे. विविध कारणास्तव बदल्या होत असल्याचे ठाण्याचे कामकाज सुरळीत होणार कसे आणि गुन्हेगारांवर वचक बसणार कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जालना जिल्ह्यात परतूर शहर संवेदनशील म्हणून ओळखले जाते. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतरराज्यीय गुन्हेगारांचा वावर असल्याचे यापूर्वीच्या पोलीस कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे चोऱ्या, धाडसी चो-या, मारामा-या, दिवसा ढवळया रिव्हालवर लावून सोन्या-चांदीच्या दुकानाची लूट, धमकावणे आदी प्रकार सातत्याने घडतात. शहरात मागील दोन वर्षात मोठया प्रमाणात चो-या झाल्या आहेत. याबरोबरच ग्रामीण भागातही धाडसी चो-या होऊन लाखो रूपयांचा ऐवज चोरीस गेला. या चोऱ्यांचे तपास अद्याप गुलदस्त्यात आहेत. दिवसेंदिवस शहरातही गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंद्यातून होणारी कमाईही या गुन्हेगारीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याला जबाबदार अधिकारी देवून स्थैर्य येणे महत्वाचे आहे.
पोलिस ठाण्याचा, गवांचा, गुन्हेगार व गुन्हेगारीचा अभ्यास होण्यापूर्वीच पोलिस निरीकांची बदली होते आहे. परतूर ठाण्याच्या बाबतीत हा प्रकार सुरू असून, मागील सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांनी ठाण्याचा कारभार पाहिला आहे. तर तीन वर्षात सहा पोलिस निरीक्षक लाभले आहेत. किमान तीन वर्षे एक अधिकारी ठाण्याचा प्रभारी म्हणून काम पाहतो. मात्र, गत तीन वर्षापासून परतूर ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा खेळ सुरू आहे.
९ फेब्रुवारी २०१६ रोजी घनश्याम पाळवदे यांनी पोलिस निरीक्षक म्हणून पदभार घेतला. ते दोन वेळा बदलून गेले आणि पुन्हा आले. २४ मार्च २०१६ रोजी महादेव राऊत आले. मात्र, ते केवळ तीनच महिने राहिले. ३० मे २०१७ रोजी आर.टी. रेंगे यांनी पदभार घेतला. रेंगे यांचा कार्यकाळ केवळ १७ महिन्यांचाच ठरला. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेंद्र गंदम यांनी पदभार घेतला. मात्र, त्यांचीही अचानक तडकाफडकी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या सुभाष भुजंग यांची दहा-पंधरा दिवसातच बदली झाली. सद्यस्थितीत पोनि शिरीष हुंबे यांच्याकडे ठाण्याचा पदभार आहे.
१३ आॅगस्ट २००९ पासून केवळ गणेश जवादवाड यांनीच आपला कार्यकाळ पूर्ण करून गुन्हगारी जगतावर वचक निर्माण केला होता. त्यानंतर १४ जून २०१३ ते आजपर्यंत म्हणजे सहा वर्षात ११ पोलिस निरीक्षक या ठाण्याला लाभले. पोलिस निरीक्षकांचा कार्यकाळ अल्प ठरत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या अडचणी निर्माण होण्याचे बोलले जात आहे.