ट्युशनला जातो सांगून घराबाहेर पडलेली तीन शाळकरी मुलं बेपत्ता

By विजय मुंडे  | Published: August 16, 2023 07:29 PM2023-08-16T19:29:58+5:302023-08-16T19:31:49+5:30

पोलिस पथकासह पालक, नातेवाईक शोध कार्यासाठी विविध मार्गावर

Three school children went missing by saying they were going for tuition | ट्युशनला जातो सांगून घराबाहेर पडलेली तीन शाळकरी मुलं बेपत्ता

ट्युशनला जातो सांगून घराबाहेर पडलेली तीन शाळकरी मुलं बेपत्ता

googlenewsNext

जालना : ट्युशनला जाण्याच्या बहान्याने मंगळवारी सकाळी घराबाहेर पडलेली जालना शहरातील तीन शाळकरी मुलं बेपत्ता झाली आहेत. या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. शिवाय त्या शाळकरी मुलांच्या शोधासाठी पालकांसह नातेवाईकही विविध मार्गावर फिरत आहेत.

अंकित प्रकाश जाधव (वय-१५ रा. सिचंन वसाहत, ईदगा मैदानाच्या मागे जुना जालना), स्वराज संतोष मापारी (वय-१४ रा. घायाळ नगर, जुना जालना) व हर्षद अशोक देवकर (वय-१४ रा. कसबा, गांधीचमन, जुना जालना) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. पाटबंधारे विभागात कामाला असलेले प्रकाश जाधव हे मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदनासाठी निघाले होते. त्यावेळी स्वराज मापारी व हर्षद देवकर हे दोघे त्यांच्या घरी आले. त्यांनी त्यांचा मुलगा अंकित याला हाक दिली. झोपेत असलेल्या अंकितला त्याच्या वडिलांनी उठविले आणि ते झेंडावंदनासाठी गेले. कार्यक्रमानंतर दुचाकीच्या डिक्कीतील हेडफोन मित्राला देण्यासाठी त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यावेळी दुचाकी व अंकित घरी नसल्याचे समजले. घरातील दरवाजाच्या हॅण्डलला एक चिठ्ठी आढळली. त्यानंतर जाधव यांनी मापारी, देवकर कुटुंबाशी संपर्क साधला असता ते दोघे ट्युशनसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाल्याचे समजते. ते तिघे बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी सर्वत्र शोध सुरू केला. सायंकाळपर्यंत त्या तिघांचा शोध न लागल्याने या प्रकरणात प्रकाश जाधव यांनी कदीम ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्या तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका
अंकित जाधव याने घर सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. मम्मी, पप्पा आणि मयूर तुम्ही हे लेटर वाचेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी एवढा माेठा झालो नाही की मी असे डिसिजन घ्यावे. मी घर सोडून जात आहे. पत्ता शोधण्याचा प्रयत्न करू नका वगैरे मजकूर चिठ्ठीत आहे. ही चिठ्ठी हाती लागल्यानेच ते तिघे मित्र घरातून निघून गेल्याचे समोर आले.

सोशल मीडियातून आवाहन
त्या तिन्ही शाळकरी मुलांचा पोलिस दलाच्या वतीने विविध माध्यमातून शोध घेतला जात आहे. त्याशिवाय फेसबूक, व्हाटस्ॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या तिन्ही मुलांच्या शोधासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव
उद्योगनगरी, बियाणांची राजधानी म्हणून जालना शहराची ओळख. परंतु, जालना शहरातील प्रमुख मार्गावर, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे. दुचाकी चोरी, वाहन चोरीसह घरफोड्यांच्या घटना सतत होतात. परंतु, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटेही सापडत नाहीत. शहरातील प्रमुख मार्गावर, चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर ते शाळकरी मुलं कोणत्या मार्गावरून गेले याचा शोध घेण्यास पोलिसांनाच मदत झाली असती. परंतु, प्रमुख मार्गावरच सीसीटीव्ही नसल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: Three school children went missing by saying they were going for tuition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.