चोरट्यांच्या शोधार्थ तीन पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:41 AM2020-02-21T00:41:18+5:302020-02-21T00:41:38+5:30
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बुधवारी दुपारी एकास मारहाण करून ५ लाख ८० हजार रूपयांची रोकड चौघांनी लंपास केली होती. आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलिसांचे पथक कार्यरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बुधवारी दुपारी एकास मारहाण करून ५ लाख ८० हजार रूपयांची रोकड चौघांनी लंपास केली होती. या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलिसांचे पथक कार्यरत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.
शहरातील उद्योजक विशाल दाड हे बुधवारी दुपारी त्यांच्या कारमधून औद्योगिक वसाहतीतील कंपनीत आले होते. कंपनीच्या प्रवेशद्वारावर कार उभा करून त्यांचे सहकारी कर्मचारी अल्लमखाँ पठाण यांना कारमधील डबा व बॅग आणण्यास सांगितले. दाड आतमध्ये गेल्यानंतर पठाण हे कारमधील बॅग घेऊन कंपनीत जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांपैकी एकाने पठाण यांच्यावर लोखंडी रॉडने वार करून ५ लाख ८० हजार रूपयांची पैशांची बॅग घेत पोबारा केला. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून गेले. या प्रकरणात दाड यांच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक कार्यरत आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत आरोपींचा शोध लागला नव्हता.