‘समृद्धी’ चे तीन टप्पे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:03 AM2018-01-22T00:03:00+5:302018-01-22T00:03:23+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे.

Three steps of 'Samrudhi'! | ‘समृद्धी’ चे तीन टप्पे !

‘समृद्धी’ चे तीन टप्पे !

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के/जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी एकूण १६ उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे. कमीत कमी वेळात प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १५३ किलोमीटरवरून जाणा-या या महामार्गाचे काम तीन टप्प्यांत विभागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर ते मुंबई ७१० किलोमीटर लांबी असलेला समृद्धी महामार्ग जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील ४० गावांमधून जाणार आहे. मराठवाड्यात या महामार्गाची लांबी १५३ किलोमीटर राहणार आहे. समृद्धी महामार्गाच्या घोषणेनंतर सुरुवातीच्या काळात महामार्गाची पाच विभागांत विभागणी करण्यात आली होती. यात विभाग एकमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश होता. विभाग दोनमध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाणा, विभाग तीनमध्ये जालना आणि औरंगाबाद, विभाग चारमध्ये अहमदनगर आणि नाशिक आणि विभाग पाचमध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. आता मार्चअखेर या महामार्गाचे भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी कामाचे योग्य पद्धतीने विभाजन करून वेगाने काम पूर्ण करण्याचा उद्दिष्ट रस्ते विकास महामंडळाने समोर ठेवले आहे. ज्या जिल्ह्यातून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जाणार आहे, अशा जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थती, कामाचे स्वरूप या बाबींचा विचार करून महामार्गाचे १६ भागांत विभाजन करण्यात आले. सुरुवातीला पाच विभागात झालेल्या जिल्हानिहाय विभागणीचे पुढे १६ उपविभाग करण्यात आले. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतून होणा-या समृद्धी महामार्गासाठी अनुक्रमे ४२, ५४ आणि ५७ किलोमीटर लांबीचे तीन विभाग पाडण्यात आल्याची रस्ते विकास महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी एच. व्ही. अरगुंडे यांनी दिली.
----------
जिल्ह्यात पन्नास टक्के भूसंपादन
जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी ४४० हेक्टर २० गुंठे जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यास शेतक-यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जालना तालुक्यातील तांदूळवाडी, पानशेंद्रा, नंदापूर, अहंकार देऊळगाव, थार, बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक, गेवराई इ. गावांमधील २०७ हेक्टर ९१ गुंठे जमिनीच्या खरेदीखताची प्रक्रिया रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. या शेतक-यांना मोबदल्यापोटी आतापर्यंत सुमारे २२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
-------------
कोट
समृद्धी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन माचअखेर होईल. महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या असून संपूर्ण प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
-खा. रावसाहेब दानवे

Web Title: Three steps of 'Samrudhi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.