नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:40 AM2019-11-25T00:40:24+5:302019-11-25T00:40:36+5:30

ग्रामपंचायत प्रशासनातील नियोजनाचा अभाव, गावात असलेले अपुरे जलकुंभ, पाईपलाईनला ठिकठिकाणी लागलेली गळती यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना नियमित वेळेत पाण्याचा पुरवठा होत नाही.

Three-thirteenth of water supply without planning ...! | नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा...!

नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा...!

Next

जालना : यंदा परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नियमितरित्या पाण्याचा पुरवठा होईल, अशी आशा गावा-गावातील नागरिकांना होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनातील नियोजनाचा अभाव, गावात असलेले अपुरे जलकुंभ, पाईपलाईनला ठिकठिकाणी लागलेली गळती यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांना नियमित वेळेत पाण्याचा पुरवठा होत नाही. अनेक गावात तर उन्हाळ्याप्रमाणेच आठ ते पंधरा दिवसाला पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नळाचे पाणी अशुध्द असल्याने अनेक गावातील नागरिक, व्यवसायिक आजही जारच्या पाण्यावरच तहान भागविताना दिसत आहेत.
आठ वर्षानंतरही राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण होईना...
दिगंबर गुजर।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : बाजारपेठेचे गाव असलेल्या कुुंभार पिंपळगावात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून, इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे.
घनसावंगी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगावची १५ हजार लोकसंख्या आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी २०११ मध्ये सव्वा कोटी रूपयांच्या राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र, आजवर ही योजना पूर्णत्वास आली नाही. सध्या गावाला एकाच जुन्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. विहिरीतील पाणी एका कालबाह्य जलकुंभात टाकून गावातील मुख्य बाजारपेठ भागातील रहिवाशांना पुरविले जाते. मात्र, पाणी अस्वच्छ असल्याने अनेकजण जारचे पाणी विकत घेत आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही योजना ग्रामपंचायतकडून राबिण्यात आलेली नाही. पाण्यात जंतूनाशक औषध टाकण्यात येत असल्याचे सांगितले जाते. गावात एकूण २६ शासकीय बोर असून, त्यातील असंख्य बोर हे किरकोळ दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत आहेत.
सन २०११ साली तत्कालीन पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हा परिषद अध्यक्षा किर्ती उढाण यांच्या हस्ते राष्ट्रीय पेयजल योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. गावातील पाणीटंचाईचा प्रश्न या योजनेमुळे मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना हक्काचे पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावातील काही भागात नळ बसविण्यात आले. परंतु नळाला अद्याप पाणी आलेले नाही. गावातील काही भागात तर नळही बसविण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे उन्हाळ्यात पाणी टँकरही प्रशासनाकडून मिळाले नव्हते.
मध्यंतरी गावातील पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. मात्र काही काळानंतर समितीही थंड झाली. चौकशी अहवालही गुलदस्त्यातच आहे. एकूणच गावासाठी कोट्यवधी रूपयांची योजना राबविण्यात आली. मात्र, अर्ध्या गावातील नागरिकांना बोअरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
वालसावंगीसाठी पाणीपुरवठ्याच्या दोन योजना; पुरवठा मात्र आठ दिवसाआड..
बाळासाहेब मोकासरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावाला धामणा, पद्मावती प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत लागणारे पाणी साठविण्यासाठी पुरेसे जलकुंभ नसल्याने आठ दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होत आहे. शिवाय पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून, पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होत आहे.
साधारणत: ११ हजार लोकसंख्येच्या वालसावंगी गावात १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. या गावाला पद्मावती धरण व धामणा या दोन्ही प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी जलस्वराज योजना व एम.जी.पी.या दोन योजना राबविण्यात आल्या. परंतु, निधी आपुरा पडला आणि त्याचा परिणाम योजनेच्या कामावर झाला. परिणामी कायम पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सतत गळती लागत आहे. पद्मावती धरणावरील जलवाहिनी लेंडी नदीत वारंवार फुटते. पुराच्या पाण्यात ही पाईपलाईन वाहून गेली होती. मात्र, तिची कायम दुरूस्ती होताना दिसत नाही. या योजनांवर जलशुध्दीकरण केंद्र नाही. मात्र, जलशुध्दीकरणासाठी औषधी टाकून पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
दोन योजना, बोअर असतानाही गावाला आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या लोकसंख्येनुसार किमान ५ लाख लिटर पाणीसाठवण क्षमतेचे जलकुंभ अपेक्षित आहेत. मात्र, सध्या गावात तीन जलकुंभ असून, याची क्षमता २ लाख ८० हजार लिटर इतकी आहे. जलसाठवण क्षमता अपुरी असल्याने गावाला आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रस्तावही पाठविला आहे. मात्र, तो तीन वर्षांपासून प्रस्तावित आहे. या योजनेंतर्गत नवीन जलकुंभाचे काम होण्याची अपेक्षा आहे. योजना मंजूर झाली नाही तर नवीन जलकुंभासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.
टेंभुर्णी गावासाठी राबविल्या तीन पाणीपुरवठा योजना; पाण्याचे वितरण मात्र, पंधरा दिवसाला
नसीम शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : टेंभुर्णी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन योजना राबविण्यात आल्या. मात्र, नियोजनाचा अभाव, योजनेतील अडचणींमुळे गावाला आजही पंधरा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो. गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी खडकपूर्णा धरणावरून होणारी योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे.
१५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या टेंभुर्णी गावाला जवळ असलेल्या अकोलादेव येथील जीवरेखा धरणावरून व डावरगाव देवी येथील पूर्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी जिवरेखा धरणावरील जुनी पाईप लाईन योजना, भारत निर्माण योजना व डावरगाव देवी येथील जलस्वराज योजना अशा तीन योजना राबविल्या गेल्या आहेत. सद्यस्थितीत जुनी योजना जीर्ण झाल्याने तिला जागोजागी गळती लागली आहे. गावात ५ लाख लीटर क्षमतेचे तीन जलकुंभ असून, पावसाळ्यात जलकुंभ रोज भरतात. मात्र, उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणीटंचाई जाणवते. उन्हाळ्यात ग्रामस्थांना नळाच्या पाण्यासाठी दीड- दीड महिना वाट पहावी लागते.
गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर येथून खडकपूर्णा धरणावरील नवीन योजना त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मागील वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे यांच्या पुढाकाराने ७ कोटी तरतुदीची ही योजना मंजूर झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र ही योजना तांत्रिक अडचणीत अडकल्याने या योजनेचे भिजत घोंगडे किती दिवस चालणार असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. दरम्यान, आता वाटर बिल्ड अंतर्गत खडकपूर्णा येथून टेंभुर्णी- राजूर ही योजना लवकरच सुरु होणार असल्याचे गटविकास अधिकारी सुखदेव शेळके यांनी सांगितले.

Web Title: Three-thirteenth of water supply without planning ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.