तोंडाला बांधून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून एकास लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:38 AM2021-04-30T04:38:14+5:302021-04-30T04:38:14+5:30
जालना : तोंडाला बांधून दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून एकास लुटल्याची घटना जालना शहरातील नाव्हा ...
जालना : तोंडाला बांधून दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून एकास लुटल्याची घटना जालना शहरातील नाव्हा चौफुलीजवळ गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी ५०,००० रुपये रोख, शेतीचे रजिस्ट्रीचे कागदपत्र, आंध्रा ब बडोदा बँकेचे चेक बुक, एटीएम, शिंदे महाराज यांची वारसाची व नामांतराची फाइल तसेच रेशन कार्ड असा मुद्देमाल लंपास केला. बळीराम जाधव हे गुरुवारी सकाळी एका बँकेतून पैसे काढून पिशवीमध्ये पैसे व कागदपत्रे ठेवून स्कूटी क्र. (एमएच.२१.एसडब्ल्यू. ९१०६) ने नाव्हा रोडवरील टेलिकाॅम कॉलनीतील एका मित्राकडे जात होते. नाव्हा चौफुलीजवळ आल्यावर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर जाधव यांनी आपली स्कूटी रस्त्याच्या बाजूला घेतली. तिन्ही इसमांनी चाकूचा धाक दाखवून जाधव यांच्याकडील पिशवी हिसकावली अन् कन्हैया नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने निघून गेले. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. ५०,००० रुपये रोख रक्कम, शेती रजिस्ट्रीचे कागदपत्र, आंध्रा व बडोदा बँकेचे चेक बुक, एटीएम, शिंदे महाराज यांची वारसाची व नामांतराची फाइल, रेशन कार्ड असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि नागवे, पोउपनि. झलवार, पोउपनि. भताने यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बळीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. भताने हे करीत आहेत. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस चोरट्यांच्या मागावर असून, लवकरच चोरटे जेरबंद करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिले आहे.