जालन्यात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:29 PM2019-03-01T17:29:20+5:302019-03-01T17:29:58+5:30
जोगलादेवी वाळू पट्याचा अद्यापही लिलाव झालेला नाही
तीर्थपुरी (जालना ) : घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील वाळू पट्यातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा शुक्रवारी गोंदी पोलिसांनी पकडले. आज सकाळी झालेल्या या कारवाईने वाळू तस्करांमध्ये खळबड उडाली आहे.
परिसरातील जोगलादेवी वाळू पट्याचा अद्यापही लिलाव झालेला नाही, असे असतांना परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी आज सकाळी बेकायदेशीरित्या वाळू घेऊन औरंगाबादकडे जात असलेले तीन हायवा ( क्रमांक २० ए.जी. ६८६८, एम. एच २० ए. जी. ७३४७, एम एच १२ एल. टी ०५७४ ) पकडल्या. या कारवाईत एकूण ७५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन हायवा चालक शेख रईस शेख दगडू, रा. सावंगी औरंगाबाद, बबन नामदेव दिंडे, रा. औरंगाबाद, पंडित ज्ञानोबा बोखारे रा. परभणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.