थरारक! पेपर देऊन बाहेर येताच व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; ४ कोटींची मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:43 PM2022-05-18T20:43:28+5:302022-05-18T20:49:26+5:30
व्यापाऱ्याने योग्यवेळी माहिती दिल्याने अवघ्या ५ तासांत पोलिसांनी केली मुलाची सुटका
जालना : ४ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या शहरातील एका व्यापाऱ्याच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांनी अवघ्या पाच तासांत सुखरूप सुटका केली. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. स्वयंम महावीर गादिया (१६ रा. श्रीकृष्णनगर, जालना), असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शहरातील श्रीकृष्णनगर येथे राहणारे व्यापारी महावीर गादिया यांचा मुलगा स्वयंम याचा बुधवारी मंठा रोडवरील पोद्दार शाळेत सीबीएसईचा पेपर होता. त्याला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चालक अक्षय घाडगे (रा. बारसोला, ता. अंबड) याने कारने सोडले होते. पेपर सुटल्यानंतर चालक पुन्हा स्वयंमला आणण्यासाठी गेला. स्वयंम व चालक गाडी घेऊन पोद्दार शाळेच्या बाहेर येताच, चार अज्ञातांनी त्यांची गाडी अडविली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून दोन अपहरणकर्ते गाडीत बसले, तर दोघे जण त्यांच्या स्वत:च्या कारने पुढे जात होते. काही वेळाने अपहरणकर्त्यांनी स्वयंमच्या वडिलांना ड्रायव्हर अक्षय घाडगे याच्या फोनवरून संपर्क करून ४ कोटी रुपयांची खंडणी मागितली व अंबड चौफुली येथे येण्यास सांगितले.
महावीर गादिया हे नातेवाइकांसह अंबड चौफुली येथे पोहोचले; परंतु अपहरणकर्त्यांनी पुन्हा फोन करून त्यांना अंबडच्या पुढे बोलावले. यानंतर गादिया यांनी पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्हीची पाहणी केली. काही वेळाने पुन्हा आरोपीने फोन करून वडीगोद्रीजवळील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ बोलावले. एका कारमध्ये एक पोलीस कर्मचारी व महावीर गादिया हे पैसे घेऊन उड्डाणपुलाजवळ थांबले; परंतु अपहरणकर्त्यांना पोलीस असल्याचा संशय आला. त्यामुळे अपहरणकर्ते पुन्हा माघारी गेले.
काही वेळाने स्वयंम गादिया याने फोन करून आम्ही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलो असून, शहापूरगावाजवळ असल्याचे तो म्हणाला. पोलिसांनी चालक व स्वयंम याला एका घरात लपून राहण्यास सांगितले. पोलीस शहापूर येथे दाखल झाले. स्वयंमला ताब्यात घेऊन पालकाच्या स्वाधीन केले.