थरारक ! नॅशनल हायवेवरील बँकेत फिल्मीस्टाईल दरोडा, २५ लाख रोख, १ कोटींचे दागिने पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 07:59 PM2021-10-28T19:59:09+5:302021-10-28T20:06:26+5:30
Robbery on Buldhana Urban Bank: शहागड गावातील धुळे-औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
- सय्यद इरफान
शहागड : येथील बुलढाणा अर्बन बँकेत (Robbery On Buldhana Urban Bank) तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.
शहागड ( ता.अंबड ) येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असतांना गुरुवारी सायंकाळी पावने पाच वाजेदरम्यान तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. आत येताच तिन्ही दरोडेखोरांनी बँकेतील सात ही कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले, कर्मचाऱ्यांजवळील मोबाईल ताब्यात घेत, एक एक करून सर्व कर्मचाऱ्यांना स्ट्राॅग रुममध्ये कोंडण्यात आले.
एक कर्मचाऱ्याच्या कानशिलाला बंदूक लावून लाॅकरची चावी घेतली. त्यानंतर ड्राव्हरमधील २५ लाख रोख रकमेसह ग्राहकांनी तारण ठेवलेले दोन ड्राॅव्हरमधील सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी जवळपासच्या नागरिकांना संपर्क केला. घटनेची माहिती गोंदी पोलीसांना मिळताच शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत माग काढण्याचा प्रयत्न केला. गेवराई जि.बीड, जालना, औरंगाबाद, पैठण येथील पोलिसांना कळवून त्या त्या मार्गावर नाकेबंदी करण्याच्या सुचना केल्या. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही दरोडेखोरांचा माग लागला नाही.
२५ लाख रोख रक्कम, १ कोटींचे दागिने लुटले
दरम्यान, औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या बँक दरोड्यात जवळपास २५ लाख रुपये रोख रक्कम व ग्राहकांचे तारण ठेवलेल्या दहा कोटींच्या दागिन्यांतून अंदाजे १ कोटीचे सोने दरोडेखोरांनी लुटले असल्याचे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.