ढगाळ वातावरणासह वाऱ्यामुळे ज्वारी आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:14 AM2021-01-24T04:14:26+5:302021-01-24T04:14:26+5:30
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व ...
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे विहिरींमध्ये मुबलक जलसाठा झाला असल्याने राजूर परिसरातील रबी हंगामाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हिवाळी मका, हरभरा पिकाची लागवड केली आहे. परंतु, मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका पिकांना बसत आहे. सध्या ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याची क्रिया सुरू आहे. अशातच वातावरण बदलाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. अगोदरच सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून खरीपातील नुकसान भरपाई भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसत आहे.
बानेगाव, चांदई ठोंबरे, पळसखेडा ठोंबरी, थिगळखेडा, देऊळगाव ताड, तोंडोळी आदी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. थिगळखेडा येथील शेतकरी तुकाराम गाडेकर यांच्या शेतातील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. याचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
फोटो ओळ : बाणेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे झालेले नुकसान.