भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ- धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:54 AM2017-11-28T00:54:02+5:302017-11-28T00:55:56+5:30
भोकरदन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणा-या भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, ...
भोकरदन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भ्रमनिरास करणा-या भाजप सरकारला धडा शिकविण्याची हीच निर्णायक वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी करण्यात आलेल्या हल्लोबाल आंदोलनात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली.
पंचायत समिती कार्यालयापासून या हल्लाबोल मोर्चाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी खा़ पुंडलिकराव दानवे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी आ़ कल्याण काळे, राजाभाऊ देशमुख, डॉ. निसार देशमुख, कदीर मौलाना, बबलू चौधरी, लक्ष्मण ठोंबरे, राजेश चव्हाण, सुधाकर दानवे, रामदास पालोदकर, केशवराव तायडे, इरफानउद्दिन सिद्दीकी, दीपक वाकडे, केशव जंजाळ, नय्युम कादरी, महेश औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैलगाडीसह काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी व सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
यावेळी मुंडे म्हणाले, की भाजप सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. शेतमालास भाव नाही, जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. कर्जमाफीची घोषणा केली, परंतु अद्याप एकाही शेतक-याला त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात जनता हैराण झाल्याने या मोेर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. शेतकºयाना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी खा. रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांच्या कारभारावर चौफेर टीका केली.
---------------
घड्याळाला हाताची साथ
भोकरदन येथील राष्ट्रवादीच्या या हल्लाबोल मोर्चासाठी काँॅग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदार संघातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाला काँग्रेसचा हात मिळाल्यामुळे मोर्चा यशस्वी झाल्याची चर्चा होती.
-----------------
दानवेंना पराभूत करीन, तेव्हाच डोक्यावर केस- सत्तार
अर्जुनास्त्राच्या मदतीने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांचा येणा-या लोकसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतरच आपण डोक्यावर केस ठेवू. उंदरांनीच देशमुखांच्या गढ्या पोखरल्या, हे आम्हाला उंदरांच्या फौजा समजणा-यांनी लक्षात ठेवावे. कल्याण काळेंचा सुध्दा बिस्मिल्ला आपणच केला, असे सत्तार म्हणाले.
------------
...तरच भाजप प्रदेशाध्यक्षांचे वजन
आ़ टोपे म्हणाले की, भाजपाच्या सरकारातील नेत्यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळण्याआधीच जागोजागी अभिनंदनाचे होर्डिंग लावून उतावळेपणाचा कळस गाठला. बोंडअळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ५०० रुपये बोनस मिळवून दिले तर त्यांचे सरकारमध्ये वजन आहे, असे आपण समजू.
------------------