किताबाचे दावेदार राक्षे, जमदाडे पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:16 AM2018-12-22T01:16:09+5:302018-12-22T01:16:25+5:30
विजेतेपदाचा दावेदार असणा-या गोकूळ आवारेने मात्र, सहजपणे भंडा-याचा सांमतचा सहज पराभव करीत विजयी आगेकूच केली.
जयंत कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भूगाव येथे अभिजीत कटके हा महाराष्ट्र केसरीचा विजेता होता आणि त्याच्यासह शिवराज राक्षे याच्याकडेदेखील यंदाच्या जालना येथील प्रतिष्ठित स्पर्धेतील चॅम्पियन्स बनण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता; परंतु भाग्यक्रमांकामुळे हे दोन तुल्यबळ पहिलवान पहिल्याच फेरीत आमने-सामने उभे ठाकले गेले. त्यामुळे या दोघांची झुंज पाहण्यासाठी २५ हजारांपेक्षा जास्त कुस्तीप्रेमींचे डोळे आतूर झाले होते. ही प्रेक्षणीय झुंज उपस्थित प्रेक्षक श्वास रोखून पाहत होते. एकच शांतता पसरली होती.
विशेष म्हणजे चार आखाडे असताना अन्य तीन आखाड्यावरील कुस्त्या या लढतीसाठी थांबवण्यात आल्या होत्या. लढत जशी सुरु झाली तशी पूर्ण मैदान चैतन्यमय झाले. महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरीची लढतच ही जणू काही असल्याची भावना प्रेक्षकांत होती. दोन्ही पहिलवानांनी आक्रमक सुरुवात केली. शिवराजने नकारात्मक कुस्ती केल्यामुळे अभिजीत कटकेला एक गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर अभिजीत कटके याने एकेरी पट काढताना गुणांची आघाडी ३-0 अशी वाढवली. शिवराजने मुसंडी मारण्याचा प्रयत्न करताना दशरंग डावावर २ गुण मिळवताना आघाडी कमी केली; परंतु त्यानंतर शिवराज राक्षे याने घोटा पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु अभिजीतने हा त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटवत २ गुणांची वसूली करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
शिवराज राक्षेनंतर विजेतेपदाच्या दावेदारात गणना असणाऱ्या सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे याच्यावर रत्नागिरीचा संतोष दोरवड याने खळबळजनक विजय मिळवला. दोघांतील लढत खूपच प्रेक्षणीय ठरली. १३-८ अशी आघाडी असताना संतोष दोरवड याने अंतिम क्षणात खप्पा डावावर ज्ञानेश्वरला चीत करीत त्याचे आव्हान संपुष्टात आणले. विजेतेपदाचा दावेदार असणा-या गोकूळ आवारेने मात्र, सहजपणे भंडा-याचा सांमतचा सहज पराभव करीत विजयी आगेकूच केली.
तत्पूर्वी, ६१ किलो वजनाच्या गादी विभागात कोल्हापूरच्या सौरभ पाटील याने एकेरी पट काढताना प्रतिस्पर्धी कल्याणच्या जयेश शेळके याचा पराभव करीत सुवर्णपदकावर कब्जा केला. नाशिकचा सागर बर्डे कास्य पदकाचा मानकरी ठरला.
८६ किलो वजनाच्या गादी विभागात अहमदनगरच्या अक्षय कावरे याने पुण्याच्या अनिकेत खोपडे याला चीतपट करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. ८६ किलोच्या माती विभागातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या शशिकांत बोंगार्डे याने जालन्याच्या बालाजी येलगुंडे याला झोळी डावावर चीतपट करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ७0 किलोच्या माती विभागातील अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या राम कांबळे याने कोल्हापूरच्याच मच्छिंद्र निउंगरे याचा एकेरी पटाचा डावाच्या जोरावर ७-३ अशा गुणाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.
असा रंगला
उपांत्य फेरीचा
थरार
आज सकाळच्या सत्रात झालेल्या विविध वजन गटातील कुस्तीचा थरार चांगलाच रंगला. ८६ किलो वजन गटातील गादी विभागाच्या उपांत्य फेरीत अहमदनगरच्या अक्षय कावरे आणि कोल्हापूरचा इंद्रजित मगदूम यांच्यातील लढत प्रेक्षणीय झाली. सुरुवातीला इंद्रजितने पटात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु अक्षयने तो हाणून पाडला. त्यानंतर मात्र, अक्षयचेच पूर्ण लढतीवर वर्चस्व राहिले. त्याने एकेरी पट काढून प्रथम दोन गुणांची वसुली केली व त्यानंतर लपेट डावावर गुणांची आघाडी वाढवली. त्यानंतर त्याने डोळ्यांचे पारणे फेडणारा बॅकथ्रो मारताना ४ गुणांची वसुली करताना ही लढत १२-१ फरकाने जिंकताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. याच गटातील दुस-या उपांत्य फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोपडे याने लातूरच्या चंद्रशेखर पाटीलला नमवताना फायनलमधील प्रवेश निश्चित केला. चंद्रशेखर पाटीलने केलेल्या नकारात्मक कुस्तीमुळे अनिकेतने २ गुण घेत विजय सुकर केला. याच वजनगटातील माती विभागात कोल्हापूरच्या शशिकांत बोंगार्डे आणि जालना येथील बालाजी यलगुंडे यांनी दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. शशिकांत बोंगार्डे याने भारंदाज व एकेरी पट या डावावर उपांत्य फेरीत सोलापूरच्या दत्तात्रय नरके याचा ४-0 आणि बालाजी यलगुंडे याने चुरशीच्या लढतीत अहमदनगरच्या सागर कोल्हे याचा ४-0 अशा गुणफरकाने पराभव केला. या गटात दत्तात्रय नरळे हा सोलापूरचा मल्ल तिस-या क्रमांकावर राहिला. ७0 किलो वजन गटातील गादी विभागाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या स्वप्नील पाटील याने एकेरी पट व भारंदाज डावावर पुण्याच्या दिनेश मोकाशीवर मात केली. दुस-या उपांत्य लढतीत पुण्याच्या शुभम थोरात याने सोलापूरच्या धिरज वाकोडे याचा पराभव केला. ७0 किलोच्या माती गटात पूर्णपणे कोल्हापूरचेच वर्चस्व राहिले. त्यांच्या मच्छिंद्र निउंगरे व राम कांबळे यांनी उपांत्य फेरीत प्रतिस्पर्ध्यावर मात करीत अंतिम फेरी गाठली. या वजन गटात पुणे जिल्ह्याचा अरुण खेंगळे तृतीय आला.
६१ किलोच्या माती विभागातील उपांत्य फेरीत पुणे शहरच्या निखील कदम याने सातारा येथील सागर सूळ याचा ७-0, आणि सांगलीच्या राहुल पाटील याने दत्ता मेटे याचा १२-११ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या गटात सागर सूळने दत्ता मेटे याचा ५-४ असा पराभव करीत कास्यपदक पटकावले.