तंबाखूसेवन ठरतेय कर्करोगाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:53 AM2018-05-31T00:53:09+5:302018-05-31T00:53:09+5:30
तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत. यातील नऊ नागरिकांना कर्करोग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस तंबाखू सेवन विरोधी दिन जाहीर केला आहे. तंबाखू न सेवन करण्याबाबत जनजागृती करणे हा या मागील उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात तंबाखू, गुटखा आणि सिगारेटचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले आहे. तसेच व्यसनमुक्तीसाठी गुटखा आणि खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी असूनही जिल्ह्यात सर्रास विक्री होताना दिसून येते. तंबाखू सेवनाने फुफ्फुस, अन्न नलिका, किडनी, लहान आतडे, यकृत सारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग जडत आहे. या पदार्थांचे धोके लक्षात घेऊन सर्वानीच त्यापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. राज्यात विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. सर्वेक्षणात जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले. शहरात गुटखाजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास या दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिले होते.मात्र, त्याची अंमलजबावणी कागदावरच आहे.
५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांना व्यसन
राज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. २०१२-२०१३ मध्ये एका सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल ६० लाख नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. २०३० पर्यंत हा मृत्यूचा आकडा ८० लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवसानापासून दूर राहणे गरजेचे आहे.