आज शिष्टमंडळ चर्चेला येतेय, आता अवधीचा बहाणा नको : मनोज जरांगे पाटील
By विजय मुंडे | Published: December 21, 2023 02:15 PM2023-12-21T14:15:48+5:302023-12-21T14:16:09+5:30
आंदोलनाची दिशा ठरलेली नसताना समन्वयकांना नोटिसा का? सरकारला वाटते आम्ही मुंबईला यावे
जालना : मराठा आरक्षणासाठी सरकारने मागितला त्याप्रमाणे पुरेसा वेळ दिला आहे. आता अवधीचा बहाणा करू नये. आज शिष्टमंडळ भेटीसाठी येणार असून, आरक्षणाबाबत शासनाची सुरू असलेली कार्यवाही, राहिलेले शब्द आणि २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळणे, यावर आपण ठाम आहोत, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मराठवाड्यात सर्वात कमी नोंदी सापडल्या आहेत. अधिकाऱ्यांनी जातीयवादी धोरण अवलंबू नये. परंतु, काही अधिकारी ते धोरण अवलंबत आहेत. त्यामुळे नोंदी सापडत नाहीत. शासनाने अशा अधिकाऱ्यांना घरी पाठवावे. बीडची सभा शांततेत होणार आहे तरीही नोटिसा देवून चिथावणी देण्याचे काम सरकार करीत आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरलेली नसताना समन्वयकांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसा कोणत्या आधारावर दिल्या आम्ही मुंबईला यावे, असे सरकारला वाटते का असा सवाल करीत नोटीसा देणाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
आज दुपारी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यासह शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार आहे. चर्चेशिवाय मार्ग निघत नसतो. त्यामुळे आजवर शासनाला आम्ही पुरेसा वेळ मराठा आरक्षणासाठी दिला आहे. ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. चर्चेनंतर योग्य मार्ग निघेल, अशी आशा असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.