जालन्यात शौचालयाचे अनुदान घेऊन लाभार्थी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 09:03 PM2017-10-04T21:03:56+5:302017-10-04T21:12:20+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे बांधकाम न करणा-या १४१ लाभार्थ्यांवर बुधवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौ
जालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊन प्रत्यक्ष स्वच्छतागृहाचे बांधकाम न करणा-या १४१ लाभार्थ्यांवर बुधवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालये बांधकाम अनुदानाचा हा गैरव्यवहार नऊ लाखांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना नगर पालिकेला शहरात १३ हजार २०० वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणीचे उद्दिष्ट होते. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला शासनाकडून १२ हजारांचे तर पालिकेकडून पाच हजारांचे, असे एकूण १७ हजारांचे अनुदान निश्चित करण्यात आले. यासाठी स्वच्छतागृह नसलेल्या नागरिकांकडून वर्षभरापूर्वी अर्ज मागविण्यात आले.
निकषांची पूर्तता न करता प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून बँक खात्यावर स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान जमा करण्यात आले होते. मात्र, काही लाभार्थ्यांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम न करता अनुदान उचलल्याच्या तक्रारी आल्यांनतर पालिकेने पथक स्थापन करून अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांचा शोध सुरू केला.
शहरातील नूतनवसाहत, कन्हैयानगर, लालबाग, इंदिरानगर, कैकाडी मोहल्ला, मंगळबाजार भागातील सुमारे पाचशेहून अधिक लाभार्थ्यांचा शोध या पथकाला लागला नाही. त्यामुळे नगर पालिकेने काही महिन्यांपूर्वी ४६७ जणांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापैकी काही लाभार्थ्यांचा शोध लागला. मात्र, १४१ लाभार्थ्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
त्यामुळे या लाभार्थ्यांनी शासन अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन लागतोय पण दुस-याच जिल्ह्यात
स्वच्छतागृहाचे अनुदान लाटणा-या लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी नियुक्त पथक दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर अशा नावाची व्यक्ती या भागात राहत नसल्याचे आजूबाजूचे सांगत आहे अर्जावर दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क केल्यानंतर उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील व्यक्तींना फोन लागत असल्याने शोध पथकातील कर्मचारी वैतागले आहेत.
स्वच्छतागृहांचे बांधकामही अपूर्ण
स्वच्छता अभियानांतर्गत जालना शहरात १३ हजार वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, दोन वेळा मूदतवाढ देऊनही हे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचे पालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांत नागरिक उघड्यावर शौचास जातात. स्वच्छता अभियानांतर्गत जालना शहराची केंद्रीय पथकाकडून होणारी तपासणीही अद्याप झालेली नाही.