अनुदानाच्या पैशाने तरुणाचा जीव घेतला; सावत्र भावानेचा वाटणीच्या वादातून काटा काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:49 PM2020-12-15T18:49:03+5:302020-12-15T18:51:53+5:30
पोलिसांनी अटक केलेल्या आकाश खोजे याला चार दिवसांची पोलीस कोठडी
तीर्थपुरी : अनुदानाच्या पैशावरून झालेल्या वादातून एका युवकाचा खून केल्याप्रकरणी मयताची पत्नी, सावत्र भावासह तिघांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भणंग जळगाव (ता. अंबड) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात मयताच्या सावत्र भावाला सोमवारी रात्री जेरबंद केले आहे.
महेश प्रकाश खोजे (३५), असे मयताचे नाव आहे. भणंग जळगाव येथील महेश खोजे याला रविवारी सकाळी फिट आल्यामुळे तो अचानक दगडावर पडला. त्यावेळी डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मयताची पत्नी मुद्रिका खोजे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार प्रारंभी गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात मयताची बहीण किस्किंदा बाबासाहेब लांडे (रा. वाहेगाव, ता. गेवराई) यांनी गोंदी पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. शासनाकडून अनुदानाचे पैसे आले होते. त्यामुळे महेश खोजे यांनी दवाखान्याच्या गोळ्या आणण्यासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी त्यांचे घरातील मंडळींशी भांडण झाले. त्यातूनच त्याची पत्नी मुद्रिका खोजे, सावत्र भाऊ आकाश खोजे, शीतल आकाश खोजे यांनी महेशचा खून केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता.
तक्रार दाखल होताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी मयताचा सावत्र भाऊ आकाश खोजे यास सोमवारी रात्री ताब्यात घेतले. खोजे याने खुनाची कबुली दिल्यानंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौसाळे, हवालदार श्रीधर खंडेकर, अंकू दासर, योगेश दाभाडे, भगवान शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
चार दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी अटक केलेल्या आकाश खोजे याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.