मुसळधार पावसाने झोडपले; वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 05:22 PM2021-09-28T17:22:40+5:302021-09-28T17:29:21+5:30
rain in Jalana : कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.
अंबड ( जालना ) : तालुक्यातील गोंदी , वडीगोद्री , सुखापुरी मंडळात सोमवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. तालुक्यातील अनेक गावांत पिके पाण्यात गेली आहेत. गोदावरी व इतर नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला आहे.
तालुक्यात मागील आठवडाभरापासून पाऊस ठाण मांडून आहे. दरम्यान, सोमवारी व मंगळवारी पहाटेच शिवारात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने शेतात खरीप पिके पाण्यात गेली आहेत. तालुक्यात गोदावरी नदी, गल्हाटी नदीला पूर आला आहे. मंगला , लेंडी नदी, चांदसुरा नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. वडीगोद्री मंडळात 133 मिमी तर गोंदी मंडळात 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गल्हाटी नदीला पूर आल्याने आधीच्या पूर परिस्थितीने त्रस्त झालेल्या पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांचे पुन्हा पूर स्थितीमुळे जीवन विस्कळीत झाले आहे.
महसूल प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. महागडी बियाणे, खते व औषधींचा खर्च करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.
Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण
जायकवाडी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. नदी-नाले ओसांडून भरले असून अनेक गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. एकूणच अतिपावसाने पिके पिवळी पडून करपत आहेत. - जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या भागात वस्तुनिष्ठ पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली
दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत अंबड तालुक्यातील सात महसुल मंडळात खालीलप्रमाणे पाऊस (मी.मी.) पडला आहे.
गोंदी 160,वडीगोद्री -133 ,रोहिलागड - 45 ,,सुखापुरी 164 , धनगर पिंप्री 90 , अंबड - 77 ,जामखेड - 40 मिमी पावसाची नोंद झाली.बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे.