मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
By विजय मुंडे | Published: March 4, 2023 06:36 PM2023-03-04T18:36:46+5:302023-03-04T18:37:38+5:30
पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे
- विजय मुंडे
जालना : शहरातील मोती तलावातील अस्वच्छ पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. नगर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी बोटीद्वारे ट्रॅक्टरभर मृत मासे तलावाबाहेर काढले. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या तलावातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
शहरातील मोती तलावात माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला होता. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी नगर पालिकेतील स्वच्छता विभाग व अग्निशमन विभागाच्या जवानांना मृत मासे पाण्याबाहेर काढण्याबाबत सूचित केले होते. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, शिफ्ट इंचार्ज संदीप दराडे, नागेश घुगे, सागर गडकरी, सादिक सय्यद, रवी तायडे यांच्यासह स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, शोएब खान व १५ कर्मचारी शनिवारी सकाळी मोती तलावावर गेले. मोती तलावातील पाण्यात तरंगणारे मृत मासे बोटीद्वारे बाहेर काढण्यात आले. जवळपास एक ते दीड ट्रॉली मृत मासे तलावाबाहेर काढून नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तलावात आणखी मृत मासे असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे ते मासेही बाहेर काढून टाकण्याची मागणी होत आहे.
मासे खाणाऱ्यांच्या आरोग्याचे काय ?
मोती तलावातील मासे पकडून त्याची विक्री केली जात होती. शिवाय अनेक नागरिक स्वत: तलावाशेजारी बसून मासे पकडून खाण्यासाठी घरी नेत होते. मोती तलावातील माशांचा अचानक मृत्यू झाल्याने आता त्या तलावातील मासे खाणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
पालिकेने खोदला रस्ता
मोती तलावात ट्रकसह इतर वाहने धुणाऱ्या वाहन चालकांची संख्या अधिक होती. या वाहनांतील ऑइल, कपडे धुताना गेलेले साबणाचे, पावडरचे घटक यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही बाब पाहता नगर पालिकेने तलावाकडे जाणारा रस्ताही खोदला आहे.
नमुने तपासणीसाठी पाठवले
मोती तलावातील पाणी नमुने तपासणीसाठी औरंगाबादेतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर माशांचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती समोर येईल.
-एस. एम. कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी,प्रदूषण नियंत्रण महामंडळ
पाण्याचे नमुने घेतले
मोती तलावातील मृत मासे काढले जात असून, प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली जाईल.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी
कारवाई करावी
मोती तलावात वाहने धुणे, कपडे धुण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी ऑइलसह इतर घटकांमुळे तलावातील पाणी अशुद्ध होऊन माशांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या तलाव परिसरात येणाऱ्या पक्ष्यांची संख्याही घटली आहे. प्रशासनाने माशांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी.
- ज्ञानेश्वर गिराम, पर्यावरणप्रेमी