कार-पिकअपच्या भीषण अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:46 IST2022-06-08T18:46:12+5:302022-06-08T18:46:29+5:30
अंबड-घनसांवगी रस्त्यावरील ताडहादगाव जवळ झाला अपघात

कार-पिकअपच्या भीषण अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तीर्थपुरी (जालना) : कार व बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक झाल्याची घटना अंबड-घनसावंगी रोडवरीलर ताडहादगाव येथे बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यात तीर्थपुरी येथील व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष श्रीराम रामकिसन वाघ (५० रा. तीर्थपुरी) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी रुक्मिणी वाघ या गंभीर जखमी झाल्या आहेत.
तीर्थपुरी येथील व्यापारी श्रीराम वाघ व त्यांची पत्नी रुक्मिणी वाघ हे दोघे बुधवारी तीर्थपुरी येथून कारने घनसावंगी मार्गे अंबड येथे जात होते. अंबड-घनसांवगी रस्त्यावरील ताडहादगाव जवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास पिकअप व कारची समोरासमोर धडक झाली. यात व्यापारी श्रीराम वाघ हे ठार झाले तर त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांच्या डोक्याला मार लागला असून, त्या गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात श्रीराम वाघ यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.