रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:26+5:302021-09-23T04:33:26+5:30
घनसावंगी : शहरातून जाणाऱ्या अंबड- पाथरी मुख्य मार्गावरच अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. चक्क रस्त्यावर वाहने उभी राहत ...
घनसावंगी : शहरातून जाणाऱ्या अंबड- पाथरी मुख्य मार्गावरच अनेक चालक वाहने उभी करीत आहेत. चक्क रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत असून, याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय अपघाताचाही धोका वाढला आहे. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातून जाणाऱ्या अंबड- पाथरी मुख्य मार्गावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, नवीन बसस्थानक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. विशेष बाब म्हणजे पोलीस स्टेशनही याच भागात आहे. सध्या अंबड- पाथरी या रस्त्याच्या दुभाजकाचे काम सुरू आहे. या दुभाजकालाही जागोजागी तडे गेले आहेत. याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील नाल्याचे ढापेही अनेक ठिकाणी तुटले आहेत. अद्याप कामच पूर्ण झालेले नसताना या कामाची अशी अवस्था झाली आहे. त्यात मुख्य मार्गावर अनेक चालक आपली वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता शोधावा लागत आहे. मध्यंतरी काही प्रमाणात अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला होता. परंतु, काही दिवसातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
अनेक वाहन चालक मुख्य रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पार्किंगसाठी जागा नसल्याने अडचणीत वाढ होत आहे. याकडे संबंधित प्रशासकीय विभागाने लक्ष देऊन शहरातील समस्या सोडवाव्यात.
मझहर सय्यद, नागरिक घनसावंगी
फोटो