वाहन परवाना काढताना पाहावी लागणार वाहतूक नियमांची सीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:01 AM2018-10-08T01:01:41+5:302018-10-08T01:03:06+5:30
जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्यांच्या कार्यालयात चलचित्रांव्दारे माहिती दिली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या सर्वत्र मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तो वाहतूक नियमांचा जवळपास ४८८ प्रकारचे वाहतुकीचे नियम व सिग्न असल्याने वाहन चालकांनी लक्षात तरी किती ठेवावेत असा प्रश्न नेहमीच पडतो. यावर उपाय म्हणून आता जालना येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने त्यांच्या कार्यालयात चलचित्रांव्दारे माहिती दिली जात आहे.
वाहन घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत आहे. विविध वित्तीय संस्था, बँकांकडून वाहन खरेदीसाठी सुलभ आणि सोप्या पध्दतीने शून्य टक्के अनामत रकमेवर कर्ज मिळत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही संख्या ज्या प्रमाणे वाढली, त्यामुळे अपघतांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील अपघताचे प्रमाण हे अन्य वाहतुकीच्या तुलनेत प्रचंड आहे.
वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने देखील अपघात होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांनी या जवळपास ४८८ वाहतूक नियमांची एक सीडी तयार केली आहे. या त्यांच्या सीडीची दखल येथील उपप्रादेशिक अधिकारी संजय मेत्रेवार यांनी घेतली. तसेच ही उपप्रादेशिक विभागात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आलेल्यांना प्रथम ही सीडी एका टीव्हीव्दारे अर्धा तास दाखविण्यात येते. त्यामुळे वाहनांची चाचणी घेताना संबंधित नागरिकाला त्याचा बराच लाभ होत असल्याचे सांगण्यात आले.या सीडीच्या निर्मिती बद्दल काळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.