शिक्षकांची बदली ऑनलाईन,'रिलिव्ह' साठी आर्थिक घोडेबाजार? जालन्यात ऑडीओ क्लिप व्हायरल

By विजय मुंडे  | Published: September 8, 2022 06:07 PM2022-09-08T18:07:39+5:302022-09-08T18:07:48+5:30

बदली प्रक्रियेनंतर एका शिक्षकाने रिलिव्हसाठी शिक्षकांना पैसे मागितले जात असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्याकडे केली होती.

Transfer of teachers online, bribe for 'Relieve'? In Jalana audio clip viral of demand call | शिक्षकांची बदली ऑनलाईन,'रिलिव्ह' साठी आर्थिक घोडेबाजार? जालन्यात ऑडीओ क्लिप व्हायरल

शिक्षकांची बदली ऑनलाईन,'रिलिव्ह' साठी आर्थिक घोडेबाजार? जालन्यात ऑडीओ क्लिप व्हायरल

googlenewsNext

जालना : एकीकडे प्रयोगशील शिक्षकांमुळेजालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा डंका राज्यात वाजू लागला आहे. परंतु, आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर शिक्षकांना 'रिलिव्ह' करण्यासाठी आर्थिक घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. विशेषत: एका शिक्षकाच्या तक्रारीनंतर दस्तुरखुद्द जिल्हा परिषदेचे सीईओ मनूज जिंदल यांनी 'ऑडिओ क्लिप'द्वारे बदलीस पात्र शिक्षकांनी कोणालाही पैसे देवू नयेत, असे आवाहन केल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

जवळपास दोन वर्षाच्या खंडानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला मुहूर्त मिळाला. पती-पत्नी एकत्रीकरण, वृध्द व आजारी आई -वडील आदी कारणाने स्वः जिल्ह्यामध्ये बदली करून घेण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू असतात. २०१७ पासून ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदली प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार राज्यात जिल्हा बदलून जाणाऱ्या शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवली गेली. या आंतर जिल्हा बदलीमध्ये आतापर्यंत चार टप्पे प्रक्रिया पूर्ण झाली असून, पाचव्या टप्प्यामध्ये जालना जिल्ह्यातील मराठी व उर्दू असे १८९ शिक्षक हे आंतर जिल्हा बदलीने स्वगृही जाणार आहेत. तर १२९ जण जालना जिल्ह्यात येणार आहेत.

परंतु, या बदली प्रक्रियेनंतर एका शिक्षकाने रिलिव्हसाठी शिक्षकांना पैसे मागितले जात असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांच्याकडे केली होती. ही बाब गांभीर्याने घेत सीईओ मनूज जिंदल यांनी सोशल मीडियाद्वारे एक ऑडिओ क्लिप शिक्षकांसाठी टाकली आहे. त्यात कोणालाही पैसे देवू नयेत, कोणी पैसे मागत असेल तर तक्रार करावी, नियमानुसार शिक्षकांच्या बदल्या होतील, असे सूचित केले आहे. दरम्यान, अधिकारी पैसे मागत आहेत की अधिकाऱ्यांच्या नावाने कोणी दुकानदारी लावली याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही शिक्षकांमधून सांगितले जात आहे.

कोणालाही पैसे देवू नका
शिक्षकांची बदली प्रक्रिया नियमानुसार होत आहे. कोणी पैशांची मागणी करीत असेल तर कोणाला पैसे देवू नयेत. पैसे मागणाऱ्यांच्या तक्रारी कराव्यात. प्रशासकीय पातळीवर शिक्षकांची बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जे पात्र असतील त्यांची बदली नियमानुसार हाेईल.
- मनूज जिंदल, सीईओ, जि.प. जालना

अफवेवर विश्वास ठेवू नये
शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया ही नियमानुसार होत आहे. जिल्ह्यात आलेल्या २५ शिक्षकांना जॉइन करून घेण्यात आले आहे. त्यांना लवकरच शाळांवर नियुक्ती दिली जाईल. बदली प्रक्रियेत शिक्षकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये.
- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी

Web Title: Transfer of teachers online, bribe for 'Relieve'? In Jalana audio clip viral of demand call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.