जालना जिल्हा परिषदेत बदल्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:50 AM2018-05-08T00:50:03+5:302018-05-08T00:50:03+5:30
: जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या सुरू आहेत. सोमवारी कृषी विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा आरोरा स्वत: सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याने अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित मानल्या जात आहेत.
जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या पदांच्या बदल्या दरवर्षी मे अखेर केल्या जातात. मात्र, यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, सामान्य प्रशासन आदी विभागातील वर्ग तीनच्या लिपीक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक आदी पदांच्या विभागनिहाय बदल्या करण्यात येत आहे.
सोमवारी मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा आरोरा यांच्या उपस्थितीत कृषी विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची पंचायत समिती स्तरावर बदली होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.