वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:17 AM2019-06-03T01:17:03+5:302019-06-03T01:17:19+5:30
शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडे नियंत्रणाचा अभाव असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.
शहरातील बसस्थानक, सुभाष चौक, मामा चौक, सिंधी बाजार, मंमादेवी, शनी मंदिर, भोकरदन नाका व पाणीवेस येथे सकाळी आणी सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त बाहनधारक व रीक्षा चालकांकडे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक परिसरात तर रीक्षा चालकांनी सर्वानांच हैराण करून सोडले आहे. येथे नेहमीच रस्त्यावर रिक्षा उभ्या असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात छोटे मोठे अपघातही होतात. शहरातील रस्त्यावर पाकींगसाठी जागा असतांनाही रिक्षाचालक व बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. परिणामी नागरिकांसाठी वाहतूक कोंडी डोखेदुखी ठरत आहे. संबधित विभागाने वाहतूकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
हातगाड्यांचा वाहतुकीस अडथळा
नगरपालिकेने महिन्यांपूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील हातगाड्या हटविल्या होत्या. काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, शहरातील गांधीचमन, मंमादेवी परिसरत, शनीमंदिर चौक, मामाचौक परिसरात रस्त्यावर हातगाड्या सर्रासपणे लावल्या जातात.
शहरात औरंगाबाद, नादेंड व अन्य जिल्ह्यातील रीक्षा चालकांचा वावर वाढला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात एम.एच २०, एम. एच.४१ व अन्य पासिंगच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिणामी, वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे.