खटारा बसेसला प्रवासी वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:19 AM2020-03-07T00:19:22+5:302020-03-07T00:19:44+5:30
जाफराबाद आगाराच्या अनेक बसेस सध्या खटारा झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जाफराबाद आगाराच्या अनेक बसेस सध्या खटारा झाल्या आहेत. या बसेसच्या नेहमीच्या त्रासाला प्रवासी वैतागले आहेत. गुरुवारी पहाटे जाफराबाद येथून सिडकोकडे जाणारी बस टेंभुर्णी जवळ येताच जिजाऊ महाविद्यालयाजवळ अचानक बंद पडली. नेमके या बसला काय झाले हे चालकालाही कळेना. शेवटी आगारातून मेकॅनिकलला बोलावे लागले. एक ते दिड तासानंतर ती बस सुरू झाली.
सद्य:स्थितीत जाफराबाद आगाराच्या अनेक बसेसची दुरवस्था झाली आहे. काहिच्या खिडक्या मोडक्या, काहिंची सिटे तुटलेली तर काहिंचा कर्कश आवाज अशा एक ना अनेक समस्या या बसेसला लागलेल्या आहेत. यातील अनेक बसेस या जुन्याही झाल्या आहेत. लांब पल्ल्यासाठी सुस्थितीतीलच बसेस पाठविणे गरजेचे आहे. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देवून आगारासाठी साध्या दराच्या नवीन बसेस उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राजू करवंदे यांनी केली.
सध्या सैलानी यात्रा सुरू असल्याने आणखी बसेसची गरज भासणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगर प्रमुख लक्ष्मण लोखंडे म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये आगाराला नविन बसेस मिळणार आहेत.