दुचाकीवरून प्रवास, रेकीनंतर देवाचे दर्शन घ्यायचे अन् दानपेटी, दागिन्यांवर हात साफ करायचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 05:00 PM2024-09-24T17:00:13+5:302024-09-24T17:42:36+5:30
परभणी, लातूर जिल्ह्यातील दोघे जेरबंद : दागिने, दुचाकीसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त
जालना / तीर्थपुरी : जिल्ह्यातील आष्टी, तीर्थपुरी, गोंदी, अंबड भागातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या परभणी, लातूर जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी गंगाखेड येथून जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीतील ९४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेषत: दुचाकीवरून प्रवास करताना मंदिरांत दर्शन घेणे आणि जेथे कोणी नसेल तेथील दानपेटी, देवाचे दागिने घेऊन पसार व्हायचे, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
गोविंद तानाजी चव्हाण (रा. बरकतनगर गंगाखेड जि. परभणी), सुनील वामन पवार (रा. किनगाव ता. अहमदपूर जि. लातूर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी तीर्थपुरी, आष्टी, गोंदी पोलिस ठाणे हद्दीतील मंदिरांमध्ये चोऱ्या झाल्या होत्या. या चोऱ्यांचा उलगडा करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर या चोऱ्यांमध्ये तानाजी चव्हाण (रा. बरकतनगर, गंगाखेड, जि.परभणी) याचा हात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेत रविवारी गंगाखेड येथून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सुनील वामन पवार (रा. किनगाव, ता.अहमदपूर, जि.लातूर), शेख अजिम शेख अकबर (रा.गंगाखेड) यांच्या मदतीने मंदिरांत चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुनील पवार याला किनगाव येथून ताब्यात घेतले तर शेख याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मंदिरातील चोरीस गेलेल्या दागिन्यांसह दुचाकी असा जवळपास ९४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, देवीदास भोजने, प्रशांत लोखंडे, कैलास चेके, भागवत खरात, धीरज भोसले यांच्या पथकाने केली.
सराफही चौकशीच्या फेऱ्यात
मंदिरात चोरी केलेले दागिने गंगाखेड येथील एका सराफ व्यापाऱ्यास विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित संशयित सराफ व्यापाऱ्याची चौकशी केली असून, त्याला पुढील चौकशीस हजर राहण्याचीही नोटीसही दिली आहे.
विळा विक्रीच्या बहाण्याने मंदिरांची रेकी
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघे दुचाकीवरूनच प्रवास करायचे आणि विळा विक्रीच्या बहाण्याने गावा-गावांत जायचे. गावांतील मंदिराची रेकी करायचे. मंदिरात कोणी नसेल तर दानपेटीसह दागिने लंपास करत करून पळ काढत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.